पुणे : गॅस गिझरमुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. कोथरूड परिसरात ही घटना घडली असून गॅस गिझरची गळती झाल्यामुळे हा प्रकार घडला आहे. चार दिवसांनंतर घटना उघडकीस आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामराजे किशोर संकपाळ असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो कोथरूड परिसरातील सोसायटीत राहत होता. त्याचे आई वडील बाहेरगावी गेलेले होते. तो घरी मुलांच्या ट्यूशन घ्यायचा. मागील चार दिवसांपासून घराचं दार बंद होतं. त्यामुळे ट्युशनला आलेली मुले परत जायची. मंगळवारी एका मुलाने फ्लॅटचे दार बंद असल्याची माहिती सोसायटीतील नागरिकांना दिली. 


त्याचप्रमाणे घरातून दुर्गंधी येत असल्याचे रहिवाशांच्या लक्षात आलं. तेव्हा पोलिसांनी अग्निशामक दलाच्या मदतीने फ्लॅटचा दरवाजा तोडला. तेव्हा घरात कोणीच नव्हतं मात्र बाथरूमचा दरवाजा बंद असल्याचं दिसताच तो तोडल्यानंतर रामराजे मृतावस्थेत आढळुन आला. बाथरूम मध्ये गॅस गिझर लावलेला आहे. रामराजे गिझर चालू करून आंघोळीसाठी गेला असता ऑक्सिजन अभावी गुदमरला आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 


काही दिवसांपूर्वी मुंबईतील राहणाऱ्या एका तरूणीचा देखील गिझरमधील गॅसमुळे मृत्यू झाला होता. 15 वर्षीय ध्रुवी गोहील असं या तरूणीचं नावं होतं. सकाळी आंघोळीला गेलेली ध्रुवी एक तास उलटूनही बाहेर न आल्यामुळे बाथरूमचा दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा ध्रुवी बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडली होती. 


बाथरूममध्ये चार फूटांवर असलेल्या काचेपर्यंत हा गॅस पसरलेला होता. तसेच ध्रुवीचा पायही गरम पाण्याने भाजला होता. तात्काळ तिला मंगलमूर्ती रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण 24 तासाने ध्रुवीचा मृत्यू झाला.