मुंबई - गोवा महामार्गावर कशेडी घाटात गॅस गळती, वाहतूक मार्गात बदल
कशेडी घाटात रसायन वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन गॅस गळती झाली. या अपघातामुळे मुंबई - गोवा वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे अन्य मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे.
रायगड : पोलादपूरपासून ५ किमी अंतरावर कशेडी घाटात रसायन वाहतूक करणारा टँकर आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास उलटला. या टँकरमधून अॅकॅरॅली नायट्रील या ज्वलनशील रसायनाची वाहतूक होत होती. या टँकरमधून गॅस गळती सुरू असून ती थांबविण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. या अपघातामुळे मुंबई - गोवा वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, गॅस गळती थांबविण्यात यश आले तरी खबरदारीचा उपाय म्हणून मंडणगड, महाड मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे.
महाड एमआयडीसी येथील विनती ऑर्गनिक्स कंपनीमधून पहाटे ऍकॅरॅली नायट्रिल हे ज्वलनशील रसायन घेऊन टँकर लोटे परशुराम एमआयडीसीमध्ये निघाला होता. त्यावेळी कशेडी घाटात धामनदिवी येथे टँकर आला असता महामार्गामध्ये पलटी झाला. अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती होण्यास सुरुवात झाली. एमआयडीसीचे पथक घटनास्थळी पोहोचले असून गळती थांबवण्यात आली आहे. या अपघातात कोणतीही जीवित हानी नाही.
टँकरमध्ये अॅकॅरॅली नायट्रिल हा ज्वलनशील रसायन असल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक सुरक्षेसाठी बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे गॅस गळती आटोक्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे. मात्र तूर्तास तरी कोकणात जाणारी वाहतूक राजेवाडी मार्गे महाड एमआयडीसी मार्गे खेड वरून वळविण्यात आलेली आहे. तर कोकणातून मुंबईकडे येणारी वाहतूक मंडणगड मार्गे महाड अशी वळविण्यात आलेली आहे.