Gautam Adani Meets Sharad Pawar: हिंडेनबर्ग (Hindenburg) अहवालामुळे एकीकडे विरोधक उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना दुसरीकडे शरद पवारांनी (Sharad Pawar) जेपीसी (Joint Parliamentary Committee) चौकशीला विरोध केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यातच आज गौतम अदानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. गौतम अदानी यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी जवळपास दोन तास दोघांमध्ये चर्चा सुरु होती. दरम्यान या भेटीमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार यांनी गौतम अदानी प्रकरणी जेपीसीऐवजी सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) समितीकडून चौकशी केली जावी असं विधान केलं होतं. ज्या समितीत विरोधी पक्षाचे लोक कमी आणि सत्ताधारी पक्षाचे अधिक सदस्य असतील. त्यातून काहीही निघणार नाही असं शरद पवारांनी म्हटलं होतं. शरद पवारांच्या या विधानानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याचं कारण गौतम अदानी प्रकरणात विरोधक वारंवार जेपीसीची मागणी करत असताना शरद पवारांनी मात्र उलट भूमिका घेतली. यानंतर काँग्रेसने आपण शरद पवारांच्या विधानाशी असहमत असल्याचं सांगितलं होतं. 


शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?


"हिंडेनबर्ग कोण ते माहिती नाही. पण परदेशी कंपनीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समिती अधिक विश्वासार्ह आहे. संयुक्त संसदीय समितीच्या (JPC) मागणीला माझा आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. पण जेपीसीवर सत्ताधारी पक्षाचे वर्चस्व असेल. त्यामुळे सत्य बाहेर येणार नाही. जेपीसी पेक्षा कोर्टाची समिती अधिक उपयुक्त आणि प्रभावी राहील," असं शरद पवार म्हणाले होते.



जेपीसी स्थापन करुन काहीच उपयोग होणार नाही. जेपीसीमध्ये 21 पैकी 15 सदस्य सत्ताधारीच आणि 6-7 लोक विरोधी पक्षाचे असतील. जेपीसी पेक्षा न्यायालयाची समिती अधिक उपयुक्त आणि प्रभावी राहील, असे माझे मत आहे, असंही पवार म्हणाले आहेत. 
 
काँग्रेसने शरद पवारांच्या या विधानाचा विरोध केला होता. अदानी घोटाळ्यावर शरद पवार यांचे वेगळे मत असले तरीही जेपीसी चौकशीवर काँग्रेस ठाम आहे असं नाना पटोले यांनी सांगितलं होतं. 


अलका लांबा यांच्या ट्वीटमुळे निर्माण झाला होता वाद


काँग्रेस नेत्या अलका लांबा (Congress Alka Lamaa) यांनी शरद पवारांना अदानींसंबंधी भूमिकेनंतर लोभी म्हणत ट्वीट केलं असल्याने वाद निर्माण झाला होता. शरद पवार यांच्या या विधानानंतर अलका लांबा यांनी ट्विटरला शरद पवार आणि गौतम अदानी यांचा एक फोटो शेअर केला होता. फोटो ट्विट करत त्यांनी लिहिलं होतं की "घाबरलेले लोभी लोक आज आपल्या वैयक्तिक हितांसाठी हुकूमशाही सत्तेचे गुणगाण गात आहेत. एकटे राहुल गांधी देशातील लोकांची लढाई लढत आहेत. चोरांशीही आणि त्यांना वाचवणाऱ्या चौकीदारांशीही".