Gautami Patil Apology: दादा सॉरी... गौतमी पाटीलने मागितली अजीत पवार यांची माफी
दादा मला माफ करा असं म्हणत गौतमी पाटीलने हात जोडून माफी मागितली आहे.
Gautami Patil NCP Ajit Pawar: लावणी डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) हिने विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची माफी मागितल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. अजितदादा मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही. झालेल्या चुकांची माफी मागितली तरीही लोक जुने व्हिडिओ काढून ट्रोल करतात असं गौतमीने म्हंटल आहे.
अलिकडेच अशिल डान्स कार्यक्रमांच्या आयोजनावरून अजित पवारांनी पदाधिका-यांना खडसावलं होतं. पदाधिका-यांनी असे कार्यक्रम आयोजित करू नयेत अशी सूचनाही अजित पवारांनी केली होती. त्यानंतर गौतमी पाटीलने सपशेल शरणागती पत्करल्याचे समजते.
लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स सुरू आहे. गावागावात लावणीच्या नावानं अक्षरशः धांगडधिंगा सुरू आहे. या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढं सरसावली आहे. अजित पवारांनी अशा डान्सविरोधात फर्मानच जारी केले आहे.
राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाची अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. पदाधिकाऱ्यांसह झालेल्या या बैठकीत सांस्कृतिक विभागाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष मेघा घाडगे (Megha Ghadge) यांनी बैठकीत अश्लील कार्यक्रमांचा मुद्दा उपस्थित केला होता. मागील काही महिन्यांपासून गौतमी पाटीलच्या अश्लील डान्सच्या कार्यक्रमाचं आपल्याच पक्षातील नेत्यांकडून आयोजन करण्यात येत असल्याची तक्रार मेघा घाडगे यांनी अजित पवारांकडे केली होती. यानंतर अजित पवार यांनी मोठा निर्णय घेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या कलाकारांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाला राष्ट्रवादी पक्षात बंदी घालावी. राज्यभरात कुठेही पक्षाच्या कार्यक्रमात किंवा पक्षाच्या पदाधिकऱ्यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन न करण्याच्या सूचना अजित पवारांनी केल्या आहेत.
सांगलीत गौतमीच्या कार्यक्रमाला तरुणांची तुफान गर्दी
सांगलीत गौतमीच्या कार्यक्रमाला तरुणांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी मात्र, महिलांची गौतमीच्या कार्यक्रमाला पाठ फिरवली होती. अश्लील हातवारे करून लावणीच्या नावाखाली अश्लीलता केली जात असल्याचा आरोप गौतमी पाटीलवर केला गेला. यामुळे नेहमीच गौतमीचा डान्सचा कार्यक्रम वादात असतो. सांगलीत गौतमीचा कार्यक्रम उधळून लावण्याचा सुद्धा इशारा काही संघटनांनी दिला होता. यावर टीकाकारांना गौतमीनं प्रत्युत्तर दिले होते.मी काहीही चुकीचं करत नाही, माझ्यावर टीका करावी, असं गौतमीनं म्हटल होत.