गौतमी पाटील मोठ्या अडचणीत; अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
गौतमी पाटीलवर नगरमधे गुन्हा दाखल झाला आहे. गणपती विसर्जना दरम्यान रस्त्यावर मंडप घातल्यामुळे मंडळ अध्यक्षासह गौतमीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Gautami Patil : 'सबसे कातील गौतमी पाटील' रोजच चर्चेत असते. गणोशोत्सवानिमित्ताने अनेक ठिकाणी गौतमीचे कार्यक्रम पार पडले. गौतमीच्या कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी असते. अहमदनगर गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेणं आयोजकांना चांगलंच महागात पडलंय. कार्यक्रम आयोजीत करणाऱ्या मंडळासह गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल झाला आहे.
गौतमीसह आणखी कुणावर दाखल झाला गुन्हा?
नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर अहमदनगर मधील तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्यावर मंडप टाकून रहदारीस अडथळा होईल अशा प्रकारे गौतमी पाटील हिचा कार्यक्रम घेतल्याबद्दल गणपती मंडळाच्या अध्यक्षांसह गौतमी पाटील आणि तिच्या मॅनेजर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर शहरातील पाईपलाईन रोडवर काल सायंकाळी मृत्युंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळ यांच्यावतीने गौतमी पाटील नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास प्रशासनाने परवानगी नाकारली होती. मात्र, तरीही हा कार्यक्रम घेतल्यामुळे पोलिसांनी आता गौतमी पाटीलसह तिचा स्वीय सहाय्यक अशोक खरात याच्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. गौतमीसह कार्यक्रमाचे आयोजक असलेले मृत्युंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल सांगळे, आनंद कैलास नाकाडे, हर्षल किशोर भागवत, यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे.
का झाला गुन्हा दाखल?
पोलिसांनी परवानगी नाकारली असताना देखील हा कार्यक्रम घेण्यात आला. तोफखाना पोलीसांनी आता कारवाई केली आहे. रस्त्यात अडथळा निर्माण होईल असे कार्यक्रम घेणे तसेच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी क्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन करून डी जे सिस्टीम लावून कर्णकर्कश आवाजामध्ये गाणी लावून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण करणे, वारंवार आवाज कमी करण्याच्या सूचना देऊनही सूचनांकडे दुर्लक्ष करणे या कारणांसाठी भादवी कलम 188, 283, 341, 34 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 2, 15 व ध्वनी प्रदुषण अधिनियम 2000 चे कलम 3, 4, 5, 6, मु.पो.का.क 37 (1) (3)/ 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाळेच्या प्रांगणात गौतमी पाटीला कार्यक्रमला परवानगी देणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश
दिंडोरीत शाळेच्या प्रांगणात झालेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाची शिक्षणाधिका-यांनी गंभीर दखल घेतलीय. याप्रकरणी गटशिक्षण अधिकारी आणि गटविकास अधिका-यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील वलखेडमध्ये प्राथमिक शाळेच्या प्रांगणात गौतमी पाटीलचा डान्स कार्यक्रम झाला होता. शाळेच्या प्रांगणात गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यानं आयोजकांवर टीका झाली होती. झी 24 तासनं याबाबतची बातमी दाखवल्यानंतर शिक्षणविभागाला खडबडून जाग आलीय.