वेंगुर्ला: कोरोनामुळे सिंधुदुर्गातील जत्रांवर बंधनं आली. मात्र यंदा जत्रा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. कोंब्याची जत्रा म्हणून कोकणा बरोबरचं महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या वेंगुर्ला इथे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मातोंड-पेंडुर येथील श्री देव घोडेमुखचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गेले दोन वर्षे कोरोनामुळे जत्रोत्सव गाव मर्यादित करण्यात आला होता मात्र यावर्षी जत्रोत्सवात हजारो भाविकांनी गर्दी केली होती.


या जत्रेचं महत्त्व म्हणजे येथील घोडेमुख देवाला कोंबड्याचा नवस केला जातो. एका दिवसात 30 ते 35 हजार कोबड्यांचे बळी देण्याची परंपरा आहे. या जत्रेचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे इथलं देवस्थान नवसाला पावणारं असल्याची भक्तांची श्रद्धा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून अनेक भाविक इथे आपला नवस पूर्ण करण्यासाठी येतात.



नवसाला पावणारं देवस्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या घोडेमुखला सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक, मुंबई, कोल्हापूर आदी भागातून भाविक डोंगर चढून देवाचे दर्शन घेतात व नवस फेडतात. 


मातोंड सातेरी मंदिर येथून तरंग देवतांचे सुमारे 10 किलोमीटर पायपीट करून घोडेमुख मंदिर येथे आगमन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या जत्रोत्सवाला सुरुवात होते. 


 गावकरी, मानकरी घोडेमुख देवस्थानाला भाविकांनी आणलेल्या हजारो कोंब्याचा मान देतात. कोंब्या देऊन नवस फेडण्याची इथे परंपरा आहे. या जत्रेला मोठी गर्दी असते.