मुंबई : युती व्हावी यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेला टाळी देण्यासाठी भाजप नेते सातत्याने प्रयत्न करत आहेत. गिरीश महाजनांनीही युती व्हावी अशी प्रार्थना थेट निवृत्ती महाराजांच्या चरणी केल्याचं सांगितलं. युतीबाबत नेत्यांना निवृत्ती महाराजांनी सुबुद्धी द्यावी अशी कोपरखळीही महाजनांनी मारली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती झाली नाही तर जिंकणे कठीण होईल अशी स्पष्ट कबुली भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर दिली. लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने भाजपकडून मतदारसंघनिहाय बैठका सुरु आहेत. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चिंतेचा सूर व्यक्त केला. शिवसेना स्वतंत्रपणे लढली तर अनेक मतदारसंघांमध्ये मतांची विभागणी होईल. त्याचा मोठा फटका भाजपला बसू शकतो. असं या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी सांगितले. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन भाजपकडून पडद्यामागे शिवसेनेशी युती करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोनही केला होता. यावेळी शहा यांनी युतीचा प्रस्ताव उद्धव यांच्यासमोर मांडला. मात्र, त्यानंतरचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही.


तर दुसरीकडे शिवसेनेनेही लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या विभागवार पदाधिका-यांच्या आढावा बैठका सुरु झाल्या आहेत. शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी शिवसेना युतीसाठी सकारात्मक असल्याचे सांगितले. लोकांच्या मनात युती व्हावी, असा विचार आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे हेच घेतील, असे केसरकर यांनी म्हटलं. यापूर्वी खासदार संजय काकडे यांनीही भाजपला धोक्याचा इशारा दिला होता. 


आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती न केल्यास भाजपला मोठा फटका बसेल. ४८ पैकी ४० मतदारसंघ तर सोडाच पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना स्वत:च्या मतदारसंघातही जिंकता येणार नाही. त्यांचा दीड-दोन लाखांच्या मताधिक्याने पराभव झाला नाही तर मी राजकारणातून संन्यास घेईन असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.