...अग तो मेलाय! Instagram वर बनावट खातं तयार करुन मस्करी; तरुणीने उचललं टोकाचं पाऊल
Satara Crime News: इन्स्टाग्रामवरील बनावट प्रेम प्रकरणातून साताऱ्यातील एका युवतीचा जीव गेला आहे. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.
Satara Crime News: साताऱ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. इन्स्टाग्रामवरील बनावट प्रेम प्रकरणातून साताऱ्यातील एका युवतीचा जीव गेला आहे. या घटनेनंतर तिच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणीला अटक केली आहे. आरोपी तरुणीने इन्स्टाग्रामवर मुलाचे प्रोफाइल ओपन करुन आपल्याच मैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मात्र, प्रकरण अगंलट येतंय असं जाणवल्यानंतर फेक अकाउंट बनवलेल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा बनाव आरोपीने केला. या प्रकरणानंतर मानसिक स्थिती बिघडलेल्या मुलीने चक्क आत्महत्या केली आहे.
सोशल मीडियाचा पगडा असलेल्या युवा पिढीसाठी ही घटना खूप काही शिकवून देणारी आहे. इन्स्टासह सोशल मीडियावरील अनेक कारनामे कोणाच्या आयुष्याचा खेळ करत आहेत. तर कोणाचा जीव घेत आहेत. हे वास्तव आता नव्याने समोर आले आहे. साताऱ्यातील कोरेगाव उत्तरमध्ये घडलेली घटना साऱ्यांनाच चक्रावून टाकणारी आहे. नसलेल्या प्रियकरासाठी युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जीवाभावाच्या मैत्रिणीने तयार केलेल्या बनावट इन्स्टाग्राम अकाउंटवरच्या मुलाच्या प्रेमात युवती पडली.
फेक अकाउंटवरुन अनेक दिवस या दोघांमध्ये प्रेमाचे चॅटिंग सुरू होते. मात्र बनावट अकाउंट तयार केलेल्या मैत्रिणीला यातून बाहेर पडण्याचा पर्याय दिसत नव्हता. हे प्रकरण आपल्या अंगलट येऊ शकते, अशी भिती तिला वाटली. अखेर तिने या मुलाचा मृत्यूची बातमी प्रेमात वाहून घेतलेल्या मैत्रिणी पर्यंत पोहचवली. यातून मैत्रिणीची मानसिक स्थिती बिघडली त्यानंतर प्रियकर आता या जगात नसल्याच्या नैराश्यात तिने आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मैत्रिणीनेच केलेल्या जीवघेण्या चेष्टामस्करीने एका युवतीच्या आयुष्याचा खेळ संपला आहे. सोशल मीडियामुळे जग जवळ आले असले तरी नाती दुरावू लागली आहे. अशा या सोशल मीडिया सारख्या आभासी जगात प्रेम प्रकरणातून एका मुलीचा जीव गेल्याने सर्वानाच धक्का बसला आहे.