एका जिल्ह्यातून एक काळजी करायला लावणारी बातमी
अतिशय वेगानं विकसित होणा-या एका जिल्ह्यातून एक काळजी करायला लावणारी बातमी.
कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : अतिशय वेगानं विकसित होणा-या एका जिल्ह्यातून एक काळजी करायला लावणारी बातमी. मुलींचा जन्मदर सातत्यानं कमी होत आहे. एकीकडे महाराष्ट्रात मुलींचा जन्मदर वाढत असताना, ठाण्यात असं का होतं आहे. अभिनंदन..! राज्यात मुलींचा जन्मदर वाढलाय. केंद्र सरकारच्या अहवालात महाराष्ट्रातल्या मुलींचा जन्मदर हजार मुलांमागे 926 इतका झालाय. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक मुली जन्माला आल्यायत. मुलांपेक्षाही जास्त म्हणजे 1176 एवढा मुलींचा जन्मदर आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही मुलींची संख्या वाढलीय. रत्नागिरी आणि अमहदनगरमध्ये मात्र घट झालीय. पण सगळ्यात चिंतेची बाब आहे ठाण्यात. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून मुलींचा जन्मदर सातत्यानं घसरतोय.
गेल्या तीन वर्षांत ठाण्यात हजार मुलांमागे मुलींची संख्या ९३३, ९४३ आणि ९३० इतकी झालीय. यावर्षी मात्र हे प्रमाण 770 पर्यंत खाली आलं आहे. ठाण्यात मुलींचा जन्मदर घटण्यासाठी प्रशासन जबाबदार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी ४ महिन्यांपूर्वी यासंदर्भात एक बैठक घेतली होती. रुग्णालयं आणि दवाखान्यांची तपासणी करण्यासाठी पथकं तयार करण्यात आली होती. पण यातल्या कुठल्याच सूचनांचं पालन झालं नाही.
सोनोग्राफी केंद्रावर वचक ठेवणारी दक्षता समिती पालिकेकडून दहा वर्षांपूर्वी नेमण्यात आली होती. मात्र काही बैठकांनंतर ही समितीही बासनात गुंडाळून ठेवण्यात आली. त्यामुळे या केंद्रांवर देखरेख करणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही. या सगळ्यावर आम्ही प्रयत्न करतोय, एवढंच ठोकळेबाज उत्तर प्रशासनाकडून मिळालं. तेही कॅमे-यासमोर बोलायला नकार देत.
मुलींचा जन्मदर 770 पर्यंत खाली येणं ही चिंतेची बाब आहे, त्यावर लवकरच बैठक घेणार असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं आहे.
ठाणे शहरात अवैध सोनोग्राफी आणि गर्भपात होतात, असा सातत्यानं आरोप होतो. पण प्रशासन त्यावर अंकुश ठेवण्यासाठी काहीच प्रयत्न करताना दिसत नाहीय. आता झी मीडियानं हे उजेडात आणल्यावर तरी महापालिका आणि जिल्हा प्रशासन कारवाई करणार का, यावर अर्थातच आम्ही लक्ष ठेवून असणार आहोत.