बुलडाणा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या नावावरून राजकारण रंगलं आहे. समृद्धी महामार्गाला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही जिजाऊंचे नाव देण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे सरकारची अडचण होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला खूष करण्यासाठी सरकार समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचा नाव देण्याच्या विचारात होती. यापूर्वी या महामार्गाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची भाजपाने मागणी केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समृद्धी महामार्गाला राष्ट्रमाता जिजाऊंचे नाव दिले तर ती छत्रपती शिवाजी महाराजांना खरी मानवंदना ठरेल, असं धनंजय मुंडे म्हणाले. दरम्यान अजित पवार यांनीही धनंजय मुंडेंच्या मागणीचा पुनरुच्चार केला. समृद्धी महामार्गाला राष्ट्रमाता जिजाऊंचे नाव दिलं नाही, तर आम्ही सत्तेत आल्यावर नाव देऊ असं अजित पवार म्हणाले.


राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवर्तन संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा सध्या सुरु आहे. या दुसऱ्या टप्प्याच्या पाचव्या दिवशी बुलडाण्यामध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेमध्ये धनंजय मुंडे बोलत होते. या सभेत बोलताना त्यांनी सरकारच्या शेतकरी कर्जमाफीवरही टीका केली.


गेल्या साडे चार वर्षा़पासून हिवाळा असो वा पावसाळा या सरकारच्या चूकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी उन्हाच्या झळाच सहन करत आहे, असं मुंडे म्हणाले. आज महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. गावागावात पाण्याच्या टँकरची मागणी केली जात आहे. मात्र ती पुरवली जात नाही. दुष्काळसमयी शेतकऱ्यांना काम देणे ही सरकारची जबाबदारी आहे मात्र मनरेगा अंतर्गत कोणतेच काम नाही, असा आरोप धनंजय मुंडेंनी केला.


ऐतिहासिक कर्जमाफी करताना वापरात आलेले सरसकट, तत्वत: इतके भारदस्त शब्द बहुदा संघातूनच आले असावेत. सरसकट कर्जमाफी केली असे सरकार म्हणतंय खरं. पण बोटावर मोजता येईल इतक्या शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा झालेला नाही, अशी टीका धनंजय मुंडेंनी केली.