योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : प्रतिकारक्षमता वाढवण्याची गरज आहे, म्हणून घराबाहेर पडा, असं वक्तव्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि तज्ज्ञदेखील गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं वारंवार आवाहन करत आहेत, पण भुजबळांचं म्हणणं वेगळं आहे. भुजबळांच्या या वक्तव्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनाकारण घराबाहेर पडू नका असं सांगितलं. पण त्यांच्याच मंत्रिमंडळातील एक वरिष्ठ मंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ मात्र लोकांना घराबाहेर पडण्याचं आवाहन करत आहेत. 


खरंतर कोरोनाच्या केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत, मात्र आर्थिक कारणांसाठी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. विनाकारण घराबाहेर पडल्यास यामध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ होऊ शकते, याची भीती तज्ज्ञही व्यक्त करत आहेत. 


मुख्यमंत्र्यांचा सल्ला आणि तज्ज्ञांचं एकमत कदाचित छगन भुजबळांना मान्य नाही, असं दिसतंय. गेल्या काही दिवसातली कोरोनाची आकडेवारी पाहिली, तर लक्षात येईल की अनलॉक केल्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. अशावेळी खरंतर केवळ अत्यावश्यक गोष्टीसाठीच बाहेर पडणं अपेक्षित आहे. त्यामुळे भुजबळांचं वक्तव्य भुवया उंचावणारं आहे.