8 वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराने तरुणीची केली हत्या; आंबोली घाटात फेकला मृतदेह
Goa Crime : गोव्यातील तरुणीचा मृतदेह आंबोली घाटात सापडल्याने खळबळ उडाली होती. तरुणीची तिच्याच ओळखीच्या व्यक्तीने हत्या करुन मृतदेह आंबोली घाटात फेकला होता. पोलिसांनी याप्रकरणात दोघांना ताब्यात घेतले असून तपास सुरु केला आहे.
Crime News : गोव्यातील एका तरुणीचा मृतदेह (Goa Girl Murder) आंबोली घाटात सापडल्याने खळबळ उडाली आहे. सावंतवाडी आणि गोवा पोलिसांनी आंबोली घाटातून 70 फूट दरीतून तरुणीचा मृतदेह बाहेर काढला आहे. मृतदेहाचा एक हात व पाय सापडला नसल्याचे पोलिसांनी (Maharashtra Police) म्हटले आहे. तरुणीने पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून तरुणाने तिची हत्या करुन मृतदेह दरीत फेकल्याची माहिती शुक्रवारी गोवा पोलिसांनी दिली होती. त्यानंतर सावंतवाडी पोलीस आणि आंबोलीच्या रेक्सु टीमने शोध घेऊन मृतदेह बाहेर काढला आहे.
गोव्यातल्या या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. हत्या झालेल्या तरुणीने आरोपीचे प्रेम स्विकारण्यास नकार दिला होता. याच गोष्टीचा त्याला खूप राग आला होता. आरोपी स्वतः मुलीपेक्षा 8 वर्षांनी लहान होता. मात्र तो तिच्या प्रेमात वेडा झाला होता आणि त्यामुळे तो मुलीच्या मागे लागलो. यामुळे तरुणीने गोव्यातील पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. तरुणीने आपल्यापासून सुटका करून घेण्यासाठी पोलिसांत तक्रार दिल्याचे तरुणाला समजल्यानंतर रागाच्या भरात त्याने काही तासांतच तिची हत्या केली. यानंतर मुलीचा मृतदेह आंबोली दरीत फेकून दिला.
कामाक्षी शंकर उडपनव (28) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी गोवा पोलिसांनी प्रकाश चुंचवाड याच्यासह आणखी एकाला ताब्यात घेतलं आहे. गोव्याच्या म्हापसा पोलीस ठाण्यात मुलीची बेपत्ता तक्रार दाखल झाली होती. आरोपींनी 30 ऑगस्टला दुपारच्या सुमारास कामाशीचा चाकूने भोसकून खून केला होता. तिचा मृतदेह गाडीतून आणून त्याच दिवशी रात्री आंबोली घाटात फेकला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन प्रकाशला ताब्यात घेतले होते. त्याने हत्येची कबुली दिली आणि मृतदेह फेकल्याची जागा पोलिसांना दाखवली होती.
आरोपी प्रकाश हा परवरीम भागात एका गॅरेजमध्ये काम करतो. दोघांचे पूर्वी प्रेमसंबंध होते, असे म्हटलं जात आहे. मात्र काही वेळाने मुलीला समजले की हा प्रकाश तिच्यासाठी योग्य नाही. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्यामुळे तिने प्रेमविवाहाला नकार दिला. यानंतर आरोपी प्रकाशने तरुणीचा पाठलाग सुरू केला. तो सतत तिला त्रास देत होता. त्यामुळे तरुणीने पोलिसांत तक्रार दिली होती.
ज्या दिवशी तरुणीचा खून झाला त्याच्या काही तास आधीच तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. प्रकाश हा सतत तिचा पाठलाग करून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे तरुणीने सांगितले होते. यावर पोलिसांचे तिला काही पोलीस तुला घरी सुखरूप सोडतील असे सांगितले होते. मात्र तिने पोलीस संरक्षण घेण्यास नकार देत आपल्या एका मैत्रिणीसह पोलीस ठाणे सोडले आणि ती घरी गेली. त्यानंतर कामाक्षीची हत्या झाली.