वाल्मिक जोशी, झी 24 तास, जळगाव : आता लगीनसराई आहे त्यामुळे आपल्या घरातील दागिने जर तुम्ही पॉलिश करायला देत असाल तर सावधान! तुमच्यासोबतही फसवणूक होऊ शकते. जळगावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पितळीचं भांडं पॉलिश करायचे असतील तर सावधान तुमची फसवणूक होऊ शकते. जळगाव शहरात मेहरूण परिसरात ही घटना घडली आहे. तुमचे दागिने आणि भांडे पॉलिश करून देण्याचे सांगत दोन अज्ञातांनी महिलेचे दागिने लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे.


जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मेहरूण परिसरात राहणाऱ्या 45 वर्षाच्या महिलेच्या घरी दोन अज्ञात व्यक्ती आले. त्यांनी तांब्याचे व पितळेच्या भांड्यांना पॉलिश करून देतो असे सांगितले. त्यांना पावडर वापरून महिलेच्या घरातील भांडं पॉलिश करून दिलं. 


अंगावरचे आणि इतर दागिने पॉलिश करून देतो असं सांगत त्यांच्याकडून दागिने घेतले. महिलेला हळद आणण्यासाठी घरात पाठवलं. तेवढीच संधी साधून अज्ञातांनी दुचाकीवरून पोबारा केला. 


यासंदर्भात महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस स्थानकात कलम 406 नुसार फसवणुकीची तक्रार दाखल केली. परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.