विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील देववाडा मंदिरातील प्रभू श्रीराम, सीता आणि हनुमानाच्या पंचधातूंच्या ऐतिहासिक मूर्तीची चोरीची घटना ताजी असतानाच संभाजीनगरातही (Sambhaji Nagar) असाच काहीसा प्रकार घडला आहे. संभाजीनगरच्या कचनेर येथील जैन मंदिरातून (Jain Temple) एक कोटी किमतीच्या सोन्याच्या मूर्तीची (Gold idol) चोरी झाल्याची खळबळजन घटना समोर आलीय. धक्कादायक म्हणजे सोन्याच्या मूर्तीची चोरी करुन त्याजागी त्यासारखीच दिसणारी पितळाची मूर्ती ठेवण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कचनेर येथील चिंतामणी पार्श्वनाथ या जैन मंदिरात हा सर्व प्रकार घडला आहे. मंदिरात 1 कोटी किमतीची सोन्याची मूर्ती महिन्याभरापूर्वीच बसवण्यात आली होती. सोन्याच्या मूर्तीची चोरी केल्यानंतर त्याजागी हुबेहूब पितळेची मूर्ती ठेवण्यात आली होती. मात्र शनिवारी मूर्तीचा सोन्याचा मुलामा आणि रंग उतरायला लागल्यावर हा सगळा प्रकार लक्षात आला आहे. यानंतर जैन धर्मियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


सीसीटीव्ही बंद असल्याने बळावला संशय


पोलीस अधीक्षकांशी भेटून या चोरीची चौकशी करावी आणि मूर्ती परत मिळवून द्यावी अशी मागणी जैन समाजाने केली आहे. कचनेर हे जैन धर्मियांचा एक पवित्र स्थान आहे. तिथं भगवान पार्श्वनाथ यांची सोन्याची मूर्ती बसवण्यात आली होती. मंदिरातील मूळ मूर्तीच आता चोरीला नेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 15 डिसेंबर रोजी काही वेळासाठी सीसीटीव्ही बंद होते. त्या दरम्यानच हा सर्व प्रकार झाला का अशी चर्चा आता सर्वत्र सुरु झाली आहे.


जालन्यातही पुरातन मूर्तींची चोरी


जालन्याच्या घनसांगवी तालुक्यातही देववाडा मंदिरातही असाच काहीसा प्रकार घडला होता. पुजाऱ्यांनी रात्री मंदिर बंद केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते साफसफाईसाठी उघडले असता चोरीचा प्रकार समोर आला होता. राम, लक्ष्मण आणि सीता यांच्यासह  10 किलो वजनाच्या हनुमानाच्या पंचधातूंच्या दोन मूर्तीची चोरी करण्यात आली होती. या मूर्ती समर्थ रामदास यांच्या पूजेतील होत्या. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच चोरट्यांना अटक करुन मूर्तींची मंदिरात स्थापना करण्यात आली आहे.