सोने-चांदीच्या दरात पुन्हा उसळी, किमतींमुळे ग्राहकांना फुटला घाम, पाहा प्रतितोळा किंमत
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना आता सोने-चांदीच्या दराने पुन्हा उसळी मारल्याचे पाहायला मिळत आहे.
Gold Silver Price Today : राज्यात लोकसभा निवडणुकांचा शेवटचा आणि महत्त्वाच्या टप्प्यासाठी आज (20 मे) मतदान होत आहे. यात महाराष्ट्रातील 13 जागांवर मतदान पार पडत आहे. तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना आता सोने-चांदीच्या दराने पुन्हा उसळी मारल्याचे पाहायला मिळत आहे. सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा दरवाढ झाली आहे.
सुवर्णनगरी अशी ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात सोने चांदीचे आतापर्यंत सर्वाधिक भाव पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात देखील सातत्याने वाढ होत आहे. आज (20 मे) सोन्याच्या दरात 700 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर 76 हजार 200 रुपये प्रतितोळा झाला आहे. तर सराफा बाजारात चांदीने इतिहास रचला आहे. चांदीचा भाव मोठ्या उच्चाकांवर पोहोचला आहे.
सोने-चांदीमध्ये गुंतवणूक वाढल्याने दरवाढ
जळगावात चांदीच्या दरात एकाच दिवसात तब्बल 1400 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर प्रतिकिलो 93 हजार 700 रुपये इतका झाला आहे. चांदीचा हा दर आतापर्यंतचा सर्वाधिक विक्रमी भाव ठरला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीमध्ये गुंतवणूक वाढल्याने ही दरवाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच दिवसेंदिवस सोने-चांदीची मागणीही वाढत असल्यानेही दरवाढ होत असल्याचे बोललं जात आहे.
जागतिक बँकांचे व्याजदर कमी झाले असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपला कल वळवल्यामुळे सोन्यामध्ये सातत्याने भाव वाढ होत आहे. तसेच चायना बाजारमध्ये क्रॅशची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे चायनीज बाजारात सोन्यामध्ये गुंतवणूक वाढल्याने सोने-चांदी महाग झाले आहे. तर चांदी महाग होण्याचे मुख्य कारण इंडस्ट्रियलमध्ये चांदीचे मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे चांदीचा भाव हा विक्रमी असल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
सोन्यात आणखी भाववाढ होणार
दरम्यान जळगावच्या बाजारात सोन्याचा भाव हे जीएसटीसह 76 हजार 200 रुपये इतका आहे. तर चांदीचा दर प्रतिकिलो 93 हजार 700 इतका झाला आहे. ऐन लग्नसराईत सोने-चांदीत मोठी भाव वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोने चांदीचे दर हे सर्वसामान्य नागरिकांच्या अवाक्याबाहेर गेले आहे. सोने-चांदीचे भाव सतत वाढत असल्याने जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये ग्राहक थोडी मंदावलेली आहे. तसेच येत्या काळात सोन्यात आणखी भाववाढ होणार असल्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिकांकडून वर्तवली जात आहे.