लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : चहा पिणाऱ्यांसाठी (Tea Lovers) एक सोनेरी बातमी. आतपर्यंत तुम्ही चिनीमातीच्या कपातून, काचेच्या ग्लासातून, कागदी कपातून चहा प्यायला असाल. पण आता तुम्हाला यापुढे सोन्याच्या कपातूनही (Golden Cup) चहाचा आस्वाद घेता येणार आहे. अहमदनगरच्या (Ahmednagar) पारनेर इथले चहा आणि बेकरी व्यावसायिक स्वप्नील पुजारी यांनी चहा शौकिनांसाठी खास सोन्याच्या कपात चहा देऊ केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पारनेर शहरातील आपल्या चहाच्या हॉटेलमध्ये पाच लाख रुपये मोजून त्यांनी सोन्याचे दोन कप विकत घेतले आहेत. विशेष म्हणजे या सोन्याच्या कपात चहा प्यायचा असेल तर कुठलेही जादा चार्जेस दिले जाणार नाहीत. केवळ दहा रुपयांत सामान्य नागरिकांना सोन्याच्या कपातून चहाचा आस्वाद घेता येणारंय. 


स्वप्नील पुजारी गेल्या तीन वर्षांपासून चहाचं हॉटेल चालवतात. चहाचा दर्जा आणि चव यामुळे अल्पावधीतच त्यांच्या चहाला पसंती मिळू लागली आणि ग्राहकसंख्येतही मोठी वाढ झाली. त्यामुळे ग्राहकांना काहीतरी नवीन देण्याचा विचार स्वप्नील पुजारी यांनी केला. यातुनच त्यांना सोन्याच्या कपातून चहा देण्याची कल्पना सुचली.


ग्राहकांसाठी सोन्याचे कप घेण्याचा संकल्प त्यांनी केला. यासाठी त्यांनी तब्बल सहा लाख रुपये खर्च केले आणि दोन सोन्याचं कप विकत घेतले. चक्क सोन्याच्या कपातून चहा प्यायला मिळत असल्याने ग्राहकांसाठीदेखील हा सुखद धक्का ठरतोय. सोन्याच्या कपातून ग्राहकांना चहा देण्याची संकल्पना ग्राहकांना देखील चांगलीच आवडली आहे.


आपल्या व्यवसायाकडे आकर्षित करण्यासाठी व्यावसायिक वेगवेगळ्या शक्कल लढवताना पाहायला मिळतात. अशात स्वप्नील यांनी आपल्या चहाच्या हॉटेलमध्ये चक्क सोन्याचे कप घेऊन केवळ ग्राहकांना आकर्षित केले नाही तर शहरामध्ये आपल्या चहाची चर्चाही देखील घडून आली आहे.