अवघ्या 60 रुपयांच्या उधारीवरून मित्राने केला मित्राचा घात; गोंदियातील घटना
Gondia Crime : गोंदियात क्षुल्लक कारणावरुन मित्रानेच मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उधारीचे पैसे न दिल्याने मित्राने केलेल्या मारहाणीत मित्राचा जीव गेला आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
प्रविण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : क्षुल्लक कारणावरून दिवसेंदिवस हाणामारीच्या घटना घडत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. या घटनांमधून गंभीर खुनासारखे प्रकारसुध्दा घडल्याचे आपण ऐकत आलो आहे. अशीच एक घटना गोंदिया (Gondia) जिल्ह्याच्या दवनीवाडा पोलीस ठाणे अंतर्गत (Gondia Police) बोदा येथे घडलेली आहे. ज्यात क्षुल्लक कारणावरून मित्रानेच मित्राचा गळा आवळून खून केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
आकाश दानवे (20) असे मृत तरुणाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. तर आरोपी अल्पेश पटले याला पोलिसांनी अटक केली आहे. उसने घेतलेल्या 60 रुपयांच्या वादातून हा खून झाल्याची माहिती मिळाली आहे. मृत आकाशने आरोपी अल्पेशकडून 60 रुपये उसने घेतले होते. आरोपी अल्पेश पटले याने आकाशला उसने घेतलेले 60 रुपये परत देण्याची मागणी केली होती. त्यानंतर झालेल्या वादातून आकाशची हत्या करण्यात आली.
अल्पेशने पैसे मागितल्यानंतर आकाशने पैसे संध्याकाळी फोन - पेने पाठवतो, असे सांगितले होते. त्यावर आरोपी अल्पेश पटले याचा विश्वास बसला नाही. त्यामुळे त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. तितक्यात आरोपी अल्पेश पटले याने आकाश दानवे याचा गळा आवळून तुला खतम करतो असे म्हणून त्यास खाली जमिनीवर पाडून छातीवर मारहाण केली. त्यात आकाश हा बेशुद्ध झाला. त्यानंतर लगेचच आकाशला प्राथमिक आरोग्य केंद्र दवनीवाडा येथे हलवण्यात आले. तिथून त्याला पुढे उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे हलविण्यात आले. मात्र तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आकाशला मृत घोषीत केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरु केला. त्यानंतर घटनेची नोंद करत दवणीवाडा पोलिसांनी आरोपी अल्पेशला अटक केली आहे.
लोणावळ्यात दोन नेपाळी तरुणांचा तलावात बुडून मृत्यू
दरम्यान, लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेल्या दोन तरुणांचा तलावात बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही तरुण नेपाळचे असून त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. लोणावळ्यातल्या शिवदुर्ग टीमने अवघ्या काही तासांतच त्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. विवेक छत्री आणि करण कुंवर अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. विवेक आणि करण हे रविवारी आणखी एका मित्रासह लोणावळ्यात पर्यटनासाठी आले होते. तिघेही लोणावळ्यातील लेकजवळ पोहण्यासाठी गेले. विवेक आणि करण पोहण्यासाठी तलावात उतरले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि दोघेही बुडाले. तिसऱ्या मित्राने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी शिवदुर्ग टीमच्या मदतीने दोघांचेही मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले आहेत.