प्रविण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : गोंदियात (Gondia News) शेतात काम करणाऱ्या मजुरांवर मधमाशांनी (Bees) हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भीषण हल्ल्यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर पाच शेतमजूर जखमी झाले आहेत. अचानक मधमाशांनी केलेल्या हल्ल्यामुळे शेतात एकच गोंधळ उडाला होता. मधमाशांच्या या हल्ल्यामुळे सगळीकडे दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. गुरुवारी गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी गावात ही घटना घडली. 
 
गोंदिया जिल्ह्याच्या कुऱ्हाडी गावात शेतात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला. या घटनेत एका शेतमजूर महिला व शेतमालक सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला. पाच शेतमजूर जखमी झाले आहेत. सुमन आनंदराव आमडे व लक्ष्मीचंद पुरनलाल पटले अशी मृतांची नावे आहेत. तर अंकित लक्ष्मीचंद पटले (27), ग्यानीराम उईके (57), माया आमडे (42), अशी प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. जखमींमध्ये मंदा आमडे (42), प्रमिला चौधरी (30) यांचा समावेश आहे. सर्व कुऱ्हाडी गावचे रहिवासी आहेत.  मधमाशांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान याआधीही कुऱ्हाडी गावातील शिक्षक श्रावण कुंभारे यांचाही अशाच मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोंदियात सध्या सर्वत्र भात लावणीचे काम सुरु आहे. कुऱ्हाडी गावचे रहिवासी शेतकरी लक्ष्मीचंद पटले यांच्या शेतात भात लावणीचे काम सुरू होते. सर्व शेतमजूर भात लावणीचे काम करुन संध्याकाळी एकत्र घरी परतत होते. त्यावेळी अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात शेतमालक लक्ष्मीचंद पटले, त्यांचा मुलगा अंकित पटले व माया आमडे, मंदा आमडे, प्रमिला चौधरी, ज्ञानीराम उईके हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर तात्काळ सर्व जखमींना गोंदिया येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र उपचारादरम्यान सुमन आमडे यांचा रात्री उशिरा,तर लक्ष्मीचद पटले यांचा पहाटे 4 च्या सुमारास मृत्यू झाला.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य शैलेश नंदेश्वर व इतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली व शासकीय योजनेंतर्गत नुकसान भरपाई देण्याचे आवाहन केले.