कोरोनाबाधित बाळाला `आईचं दूध` ठरलं अमृत
सहा महिन्याच्या बाळाच्या प्रकृतीत सुधारणा
प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाने आतापर्यंत अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत साऱ्यांनाच आपल्या जाळ्यात घेरलं आहे. मात्र अशा अवस्थेतही कोरोनावर मात केली जात आहे. रत्नागिरीत एका सहा महिन्याच्या बाळाने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. महत्वाची बाब म्हणजे बाळाला याकरता आईचं दूध हे रामबाण उपाय ठरला आहे.
१४ एप्रिल रोज रत्नागिरीमध्ये साखरतर या गावातील बाळाला कोरोनाची लागण झाली. खळबळ उडवणाऱ्या या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले. दरम्यान बाळाला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याकरता वेगळा वॉर्ड तयार करण्यात आला आणि यामध्ये आई आणि बाळाला ठेवण्यात आले.
विशेष बाब म्हणजे बाळाच्या आईला मात्र कोरोनाची लागण झालेली नव्हती. बाळावरच्या उपचारादरम्यान डॉक्टरांचे एक पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. बाळाची आई देखील बाळासोबत त्याच वॉर्डमध्ये होती आणि बाळाला स्तनपान करत होती. सरकारनं दिलेल्या गाईडलाईननुसार हे उपचार सुरू होते.
सहा महिन्यांच्या बाळाला आईचे दूध देखील तितकेच गरजेचे असल्याचे दिसून आले. त्यामुळे स्तनपान करताना आई काळजी घेत होती. याचवेळी बाळावर उपचार देखील सुरू होते. सुरूवातीच्या दिवसांमध्ये बाळाला ताप येणे किंवा इतर त्रास जाणवला. पण, त्यानंतर मात्र बाळाच्या प्रकृतीत खूप चांगली सुधारणा झाली.
औषधोपचारादरम्यान आईच्या दूधाने बाळाला कोरोनाच्या लढाईत खरी ताकद दिली असं मत जिल्हा रूग्णालयातील बालरोग तज्ज्ञ आणि बाळावर उपचार करणाऱ्या टीमचे प्रमुख डॉ. दिलीप मोरे यांनी व्यक्त केले आहे. कारण उपचार सुरू असताना देखील बाळाला स्तनपान सुरूच होते. त्याचा देखील सकारात्मक परिणाम दिसून आल्याचं डॉ. मोरे यांनी सांगितले.
या बाळाचा दुसरा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याची माहिती दिली. शिवाय जिल्ह्यात एकही कोरोनाचा नवा रुग्ण नाही आहे. उर्वरित कोरोनाबाधित रुग्णांचे देखील रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तसेच जिल्हयातील १६ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असून ही दिलासादायक बातमी आहे. दरम्यान रत्नागिरीवासियांनी ३ मेपर्यंत सहकार्य करावे एवढी माफक अपेक्षा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.