मुंबई : ग्राहकांच्या वाढीव वीज बिलाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. राज्यभरात अनेकांना या वाढीव वीज बिलाचा फटका बसलाय. यामुळे जनतेत आक्रोश आहे. यासंदर्भात राज्य सरकारची वीज नियामक मंडळासोबत बैठक होत असून यातून ग्राहकांना २० ते ३० टक्के सूट मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात एकूण 73 लाख घरगुती वीज ग्राहक आहेत. ९३ टक्के वीज ग्राहकांना वीज बिल सूट दिल्यानंतर फायदा होणार आहे. वीज बिल सूट देण्यासाठी जानेवारी ते मार्च मधील वीज युनिटचा विचार केला जाणार आहे. वीज बिल सूट देण्याबाबत राज्य सरकार MERC ला प्रस्ताव देणार आहे. MERC ने प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव येणार आहे. वाढीव वीज बिलांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक पार पडली. या बैठकीला ऊर्जामंत्री नितीन राऊत, अनिल परब उपस्थित होते



काल देखील यासंदर्भात बैठक झाली होती. लॉकडाऊनच्या काळात बिलं वाढली त्याची वस्तुस्थिती मांडली आणि ग्राहकांना दिलासा मिळालाच पाहिजे अशी मागणी केल्याचे अनिल परब बैठकीनंतर म्हणाले. बिलं कशी जास्त आली आहेत ते वीज कंपन्यांच्या अधिकार्‍यांना दाखवून दिलं. यावर तोडगा काढण्याचं काम सुरू असल्याचं ते म्हणाले. कोण कोणत्या स्टाईलने आंदोलन करतं माहित नाही आम्ही सरकार जनतेच्या बाजूने आहोत असेही परब म्हणाले.


वीज कंपन्यांनी बदललेले स्लॅब पूर्ववत करावेत यासाठी वीज नियामक आयोगाशी चर्चा केली जाणार आहे. आयोगाचे अध्यक्ष न्यूझीलंडला असल्याने ते कालच्या बैठकीत उपस्थित नव्हते. ते आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी होणार होते.