पुणेकरांसाठी आनंदाची बातमी : `बालंगंधर्व`चा कायापालट
पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग असलेली ही वास्तु आज ५० वर्षांची झालीय.
पुणे : पुण्याच्या सांस्कृतिक मानबिंदूंपैकी एक असलेल्या बालगंधर्व रंगमंदीराचा पुनर्विकास करण्यात येणार असल्यावर शिक्कामोर्तब झालय. याबाबतची तरतूद महापालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्याची कार्यवाही प्रशासनाकडून सुरु झाली आहे. बालगंधर्वचा पुनर्विकास कशा प्रकारे करता येऊ शकतो यासाठीचे आराखडे वास्तुविशारदांकडून मागवण्यात आले आहेत. मात्र हे करताना बालगंधर्व पाडण्यात येणार नसल्याचा दावा महापौर मुक्ता टिळक यांनी केलाय.
पुनर्विकासाची प्रक्रिया
बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकास करण्याविषयीची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली होती तेव्हाच शहराच्या सांस्कृतिक तसेच राजकीय क्षेत्रात मोठा गदारोळ उडाला होता.
शहराचं वैभव असलेली ही वास्तु पाडावी की न पाडावी यावरून वेगवेगळ्या स्वरुपाची मतं समोर आली होती.
आता पुनर्विकासाची प्रक्रिया सुरु झाल्यानं पुन्हा त्याच वादाला तोंड फुटण्याची चिह्न आहेत.
५० वर्षांची वास्तू
बालगंधर्वच्या पुनर्विकासाचे आराखडे सादर करण्यासाठी वास्तुविशारदांना २१ जानेवारीची मुदत देण्यात आलीय.
बालगंधर्व रंगमंदिराचे भूमिपूजन ८ ऑक्टोबर १९६२ ला बालगंधर्वांच्या हस्ते झालं होतं.
बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच त्याचं उद्घाटन २६ जून १९६८ रोजी तत्कालिन गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झालं होतं.
बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तीमत्व असलेल्या पु.लंच्या देखरेखीखाली झाली होती.
पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग असलेली ही वास्तु आज ५० वर्षांची झालीय.