Good News for Punekars: पुण्यातील अनेक विद्यार्थी, नागरिक आता परदेशामध्ये स्थायिक झाले आहेत. मात्र ज्या प्रमाणामध्ये पुणेकरांनी परदेशाला आपलंसं केलं त्या प्रमाणात पुण्यातून थेट परदेशात जाणाऱ्या फाइट्स उपलब्ध नाहीत अशी तक्रार कायम केली जाते. त्यामुळेच अनेकदा पुणेकरांना व्हाया मुंबई भारतात दाखल व्हावं लागतं आणि त्यानंतर पुढील चार ते पाच तास रस्तेमार्गाने घरी पोहोचण्याचा मार्ग अवलंब करण्याशिवाय काही पर्याय नसतो. मात्र आता पुण्यातील अंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दोन देशांमध्ये थेट विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. ही सेवा सुरु करण्यासंदर्भातील माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.


या दोन देशांमध्ये सुरु होणार सेवा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे विमानतळावरून दोन नवीन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार आहेत. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची सोय लक्षात घेत ही दोन नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुणे विमानतळावरुन येत्या 27 ऑक्टोबर पासून सुरु होत आहेत. ज्या मार्गांवर ही सेवा सुरु केली जणार आहे ते मार्ग पुणे-दुबई-पुणे आणि पुणे-बँकॉक-पुणे असे आहेत. म्हणजेच आता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन थेट दुबई आणि बँकाँकला जाता येणार आहे. मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवरुन पोस्ट करून पुण्यातून दोन नवीन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होत असल्याचे जाहीर केलं आहे.


काय म्हणाले केंद्रीय मंत्री?


"पुणेकरांसाठी ‘गुड न्यूज’; पुण्याहून दोन नवी आंतरराष्ट्रीय उड्डाणे ! पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी दोन नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे येत्या 27 ऑक्टोबर, 2024 पासून सुरु होत असून यात पुणे-दुबई-पुणे आणि पुणे-बॅंकॉक-पुणे या मार्गांचा समावेश आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा निश्चितच फायदा होणार आहे," अशा कॅप्शनसहीत मुरलीधर मोहोळ यांनी नवीन सेवेसंदर्भातील पोस्ट केली आहे.



'त्या' मनस्तापापासून सुटका


पुण्यातून सध्या दुबईला स्पाइसजेटच्या माध्यमातून आणि सिंगापूरला विस्तारा कंपनीकडून उड्डाणे होतात. मात्र स्पाइसजेटची आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने मागील काही काळापासून वारंवार दुबईची उड्डाणे रद्द केली जात असल्याने थेट मुंबईला येऊन पुणेकरांना दुबईचं फ्लाइट पकडावं लागायचं. आता या मनस्तापापासून पुणेकरांची सुटका होणार आहे.


 


...म्हणून दोन दिवस पुण्यात पॅराग्लायडिंग, ड्रोन, हेलिकॉप्टर उड्डाण बंदी


दरम्यान दुसरीकडे पुण्यातील हवाई क्षेत्रासंदर्भातील अन्य महत्त्वाची बातमी म्हणजे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौराच्या पार्श्वभूमीवर 26 आणि 27 सप्टेंबर रोजी खाजगी अवकाश उड्डानांना मनाई करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पॅराग्लायडिंग, हॉट बलून सफारी, ड्रोन आणि इतर खाजगी हेलिकॉप्टर आणि विमान अवकाश उड्डाणांवर बंदीचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.