मुंबई : राज्यात लवकरच मान्सून प्रवेश करेल असे संकेत मिळत आहेत.. प्रतिकूल स्थितीमुळे राज्यातील मान्सूनचा प्रवेश रखडलाय. मात्र पुढील तीन दिवसात दक्षिण कोकणात मान्सून पूर्व पाऊस जोर धरेल असा इशारा हवामाना खात्यानं दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग मंदावल्यानं गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा प्रवास थांबलाय. मान्सूननं गेल्या आठ दिवसांपासून कोणतीही प्रगती केली नाही. गोव्याच्या सीमेपासून काही अंतरावरच तो रेंगाळलाय. बंगालच्या उपसागराच्या बाजूनेही त्याची प्रगती गेल्या पाच दिवसांपासून थांबली आहे. सध्या संपूर्ण केरळ, कर्नाटक, तमिळनाडूचा काही भाग, पूर्वोत्तर राज्ये आणि पश्चिम बंगालमध्ये मान्सून दाखल झाला आहे. या भागात काही प्रमाणात पाऊस होत आहे. 


सातारा


सातारा शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसाने हजेरी लावली. तासभर झालेल्या या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झालं. अचानक आलेल्या या पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढलं. या पावसामुळे काही काळ जनजीवनही विस्कळीत झालं.


मनमाड 


मनमाड शहरात वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. यावेळी सोसाट्याच्या वा-यामुळे रेल्वे स्थानकाजवळच्या इंडियन हायस्कुलच्या वर्गांचे पत्रे अक्षरशः कागदा सारखे उडाले. पत्रे उडतानाची भयंकर दृश्यं कॅमे-यात कैद झाली. काळजात धस्स करणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने मोठा अनर्थ टळला. 


येवला


येवला तालुक्यातील राजापूर गावात वादळी वा-यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली.राजापुरातील गोपाळ वाड्यात साखरपुड्याच्या मंडपावर झाड कोसळलं. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी मंडपाचं नुकसान झालंय. राजापूर परीसरात जवळपास अर्धा तास पावसानं हजेरी लावली. 


रत्नागिरी


रत्नागिरीच्या लांजा तालूक्यात मुसळधार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. भर दुपारी आलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. या  पावसामुळे बळीराजा सुखावलाय.
 


जळगावच्या रावेर तालुक्यात पावसाची हजेरी


जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला असून, तालुक्यातील उटखेडा , शिंदखेडा रसलपुर सावनमध्ये पावसाचे आगमन झाले आहे.उष्णतेपासून नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला.


विदर्भात उष्णतेची लाट कायम
पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. चंद्रपुरातल्या ब्रह्मपुरीमध्ये विदर्भातील सर्वाधिक 46.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. तर गोंदिया, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातही 45 अंशांवर तापमान गेलंय. नागपूरमध्ये 44.4 अंश तापमान आहे. उकाड्यानं नागरिक पुरते हैराण झाले आहेत.