आताची सर्वात मोठी बातमी| शनिशिंगणापूरमध्ये चौथऱ्यावर महिलांनाही परवानगी
शनिशिंगणापूरचा चौथरा आता सर्वांसाठी खुला... महिलांनाही शनिदेवाला तैलाभिषेकाची परवानगी
अहमदनगर : शनिशिंगणापूरमध्ये चौथऱ्यावर महिलांना जाऊ देण्यावर काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. त्यानंतर आता एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिशिंगणापूरमध्ये चौथऱ्यावर महिलांना तैलाभिषेक करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
हा चौथरा आता सर्वांसाठीच खुला करण्यात आला आहे. पूर्वी सर्व भाविकांना चौथऱ्यावर जाऊन तैलाभिषेक करता येत होता. मात्र, काही वर्षे या ठिकाणी महिलांना प्रवेश बंद करण्यात आला होता.
2015 मध्ये भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी महिलांना चौथऱ्यावर प्रवेश मिळावा या मागणीसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी भाविकांना केवळ पादुकांपर्यंत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता.
आता विश्वस्त मंडळाच्या बैठकीत पुरुषांसोबतच महिलांनाही तैलाभिषेक करण्यास प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यासाठी ट्रस्टची ५०० रु. ची पावती घ्यावी लागेल. त्याची अंमलबजावणी शनिवारपासून सुरू झाली. शनी बालब्रह्मचारी असल्याने महिला दुरूनच दर्शन घेत असत. चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास महिलांना मनाई होती.
या वादावर आता पडदा पडला असून महिलांसाठी चौथऱ्याजवळ जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयानंतर आता शनिशिंगणापुरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.