रत्नागिरी : कोरोनाचे संकट दिवसागणिक डोके अधिक वर काढत आहेत. या पार्श्वभूमीवर आता दिलासादायक बातमी हाती आली आहे. रत्नागिरीतील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची दुसरी टेस्ट आता निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांचा जीव भांड्यात पडला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गृहागरमधील शृंगारतळी या गावात दुबईहून आलेल्या ५० वर्षांच्या व्यक्तिचा कोरोना पॉझिटीव्ह  रिपोर्ट हा १९ मार्च रोजी आला होता. त्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्य़ाची माहिती रत्नागिरीचे आमदार आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अप्पर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड देखील उपस्थित होते. 


सध्या जिल्ह्यात ८५८ जण हे परदेशातून आले असून त्यांच्यावर आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकावर लक्ष ठेवण्यात आले आहे, अशी माहिती देखील यावेळी मंत्री उदय सामंत यांनी दिली. शिवाय, होम क्वारंटाईन असलेल्यांवर देखील लक्ष असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्यावी लागत असून अनेक कडक उपाययोजना कराव्या लागत आहेत. नागरिकांनी त्यासाठी सहकार्य करावे. १५ एप्रिल पर्यंत प्रशासनाला मोकळ्या हाताने काम करु द्या. भविष्यात आणीबाणी सारखी परिस्थिती उद्भवली तर जिल्हा रुग्णालयात ३५० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.


जिल्हा रुग्णालयातील आणि खासगी रुग्णालयातील सर्व डॉक्टर सज्ज झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात असणाऱ्या सर्व कंपन्यांनी त्यांच्या सीएसआर फंडातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आपला निधी वर्ग करावा असे आवाहन, उदय सामंत यांनी यावेळी केले.