उस्मानाबाद, नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस
उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच नाशिकमध्ये काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावली.
उस्मानाबाद : मोठ्या प्रतीक्षेनंतर मध्यरात्रीपासून उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. यापावसामुळे पेरणी करण्यासाठी थांबलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच नाशिकच्या मालेगाव आणि सटाणा तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नव्हता, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र उस्मानाबादेत मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे.
उस्मानाबाद येथे मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे पेरणी करण्याच्या कामाला वेग येणार आहे. मात्र जिल्ह्यात अजून काही ठिकाणी पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, यापेक्षा चांगला पाऊस झाला तर पेरण्या करता येतील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यापावासत पेरणी करणे म्हणजे धोका आहे, असे शेतकरी वर्गाला वाटत आहे.
मालेगाव, सटाणा येथे पावसाची हजेरी
नाशिकच्या मालेगाव आणि सटाणा तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने पावसाची आतुरतेने वाट पाहणारे शेतकरी सुखावले आहे. काल सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास वरुणराजाने मालेगाव तालुक्यातील कोठरे, दुंधे, सातमाने आणि सटाणा तालुक्यातील वायगाव, सारदे भागात जोरदार हजेरी लावली. सुमारे अर्धा तास झाललेल्या पावसाने सकल भागात पाणी साचले होते.
पहिलाच दमदार पाऊस झाल्याने शेतकरी राजाने समाधान व्यक्ते केले आहे. हा पाऊस पुरेसा नाही. चांगला पाऊस पडण्याची आशा शेतकऱ्याला आहे. दरम्यान, खरीप हंगामासाठी मशागतीच्या कामाला आता सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.