वाहन चालवताना गुगल मॅप वापरणं पडणार महागात....५ हजाराचा होऊ शकतो दंड
हल्ली तुम्हाला कुठे जायचं असेल, आणि तिथला मार्ग माहीत नसेल, तर तुम्ही सहज फोन उघडता, आणि गुगल मॅप (Google Map) लावून मार्ग शोधता. पण हे करणं तुम्हाला महागात पडू शकतं. कारण वाहतूक नियमांमध्ये (Traffic rules) ते बसत नाही.
मुंबई : हल्ली तुम्हाला कुठे जायचं असेल, आणि तिथला मार्ग माहीत नसेल, तर तुम्ही सहज फोन उघडता, आणि गुगल मॅप (Google Map) लावून मार्ग शोधता. पण हे करणं तुम्हाला महागात पडू शकतं. कारण वाहतूक नियमांमध्ये (Traffic rules) ते बसत नाही.
घटना आणि नेमका नियम काय?
दिल्लीमधील एका व्यक्तीला याच अपराधामुळे दंड भरावा लागला. कार चालकाने म्हटलं, की मी तर कुणाशी फोनवर बोलत नव्हतो, मग माझ्याकडून दंड का वसूल केला? तेव्हा दिल्ली पोलिसांनी (Delhi police) सांगितलं, की मोबाईल होल्डर वगळून जर तुम्हा फोन हातात किंवा डॅशबोर्डवर ठेऊन गुगल मॅप वापरत असाल, तर ते वाहतूक नियमांचं उल्लंघन मानलं जातं.
कारण हातात किंवा डॅशबोर्डवर फोन ठेवल्याने वाहन चालवताना तुमचं लक्ष तिकडे वारंवार जाऊ शकतं, ज्यामुळे वाहन चालवण्यावर तुमचं योग्य लक्ष राहणार नाही, असं मानलं जातं.
बऱ्याचदा लोक वाहन चालवताना गुगल मॅप वापरतात. मात्र गुगल मॅपमध्ये मार्ग टाकणं, त्याचे पर्याय शोधणं, ट्रॅफिक आहे की नाही हे पाहणं, झूम इन-झूम आऊट करणं, यामध्ये वाहन चालवण्यावरून तुमचं लक्ष भटकण्याची शक्यता आहे.
त्यामुळेच वाहन चालवताना जर तुम्हाला गुगल मॅप वापरायचा असेल, तर तो मोबाईल होल्डरवर ठेऊनच वापरावा. जर तुम्ही हातात किंवा डॅशबोर्डवर ठेऊन मोबाईलवर गुगल मॅप वापरत असाल तुम्हाला Motor Vehicle Act 2020 अंतर्गत ५ हजार रूपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.