वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर भाजपच्या संपर्कात
जत किंवा खानापूर मतदारसंघातुन निवडणूक लढवण्याची शक्यता
रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली: वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. जत किंवा खानापूर मतदारसंघातून पडळकर हे विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपा आणि शिवसेना युतीच्या निर्णयानंतर पडळकर यांच्या भाजपा प्रवेशाबाबत निर्णय होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
धनगर समाजाचा आक्रमक चेहरा आणि प्रभावशाली वक्तृत्व असलेला नेता अशी ओळख असलेले गोपीचंद पडळकर विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. २०१९ च्या सांगली लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत गोपीचंद पडळकर याना तीन लाखांहुन अधिक मतं मिळाली होती. भाजपाच्या उमेदवारासमोर त्यांनी मोठं आव्हान निर्माण केलं होतं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी केलेल्या भाजपाच्या पहिल्या सर्व्हेत शिराळा आणि जत मतदारसंघात भाजपा मागे असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे पहिल्या टप्यात शिराळामध्ये सत्यजित देशमुख यांना भाजपात घेऊन तिथे भाजपाची ताकद वाढवली. त्याचप्रमाणे आता गोपीचंद पडळकर यांना भाजपात घेऊन जतमध्ये भाजपाची ताकत वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
तर दुसरीकडे भाजपाचा गड असणाऱ्या जतमध्ये सध्या विद्यमान आमदार विलासराव जगताप यांना स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध आहे. याशिवाय, जतमध्ये धनगर समाजाची संख्या जास्त असल्याने पडळकर यांच्या नावाचा पर्याय पुढे आला आहे. तर खानापूरमध्ये पडळकर यांची मते निर्णायक ठरणार आहेत.
सध्या शिवसेनेचे अनिल बाबर या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. युती झाली नाही तरी भाजपा आपला उमेदवार म्हणून गोपीचंद पडळकर यांना खानापूरमधून उभे करू शकते.