दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई  :  म्हाडा भरती परीक्षेतील (Mhada Exam) पेपर फुटण्याआधीच पुणे पोलीसांनी (Pune Police) भरती रॅकेटमधील काही लोकांना अटक केल्याने राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. म्हाडा परीक्षेचा पेपर फोडला जाणार असल्याची माहिती एका एजंटनेच समोर आणल्याने पुणे पोलीसांना ही कारवाई करणं सोपं गेलं. या एजंटच्या ऑडीओ क्लिप (Audio Clipe) झी २४ तासच्या हाती लागल्या आहेत. झी २४ तासने २०१६-१७ साली एमपीएससी मधील भरती रॅकेटच्या गौस्पस्फोट केला होता. नांदेडच्या  योगेश जाधव या तरुणाने एमपीएससी मधील भरती रॅकेट समोर आणले होतं. म्हाडा परीक्षेतील एजंटने योगेशला संपर्क करून या परीक्षेतील रॅकेटची माहिती दिली. योगेश जाधवने पुणे पोलीसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलीसांनी सापळा रचून यातील काही जणांना अटक केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घोटाळा उघडकीस आणणाऱ्या एजंटच्या जीवाला धोका
दरम्यान, हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आणणाऱ्या एजंटनं आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय. आपलं नाव बाहेर आलं तर सगळ्या कुटुंबाला धोका होऊ शकतो, अशी भीती या एजंटला सतावतेय. योगेश जाधव यांच्याशी केलेल्या संभाषणात ही बाबत उघड झालीये. या प्रकरणामध्ये हात असलेल्यांचे हात कुठपर्यंत पोहोचलेत याचीच साक्ष यामुळे मिळतेय. 



कुंपणच शेत खातंय
टीईटी पेपरफुटीप्रकरणी  पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि शिक्षण आयुक्ताचा सल्लागार अभिषेक सावरीकरला अटक केली आहे. सुपेच्या घरी मारलेल्या छाप्यात ८८ लाखांच्या एफडी आणि सोन्याचे दागिने सापडलेत. परीक्षार्थींना पात्र करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून प्रत्येकी 50 हजार ते 1 लाखांपर्यंत पैसे घेण्यात आले होते. 4 कोटी 20 लाख रूपये जमा करुन सुपे आणि सावरीकरनं ते आपापसांत वाटून घेतले आणि विद्यार्थ्यांना परीक्षेत पात्र केले. यात तुकाराम सुपे यांनी 1.70 कोटी, प्रीतेश देशमुखनं 1.25 कोटी आणि अभिषेक सावरीकरनं दीड कोटी घेतल्याचं कबूल केलं आहे.


अपात्र विद्यार्थ्यांची चौकशी होणार
टीईटी परीक्षेत जे विद्यार्थी अपात्र असतील आणि त्यांना पात्र केलं असेल तर  त्यांची चौकशी करून त्यांना अपात्र करण्यात येईल, अशी माहिती  राज्य परीक्षा परिषदेनं झी 24 तासला दिली आहे.