पुणे : राज्यात शाळा सुरु करण्याबाबत सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण करण्याला प्राधान्य दिलं जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. पण शाळा, कॉलेज सुरु करण्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. 


सणासुदीच्या काळात काळजी घ्यावी लागेल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे शहर आणि जिल्ह्यातील पोझिटीव्हीटी दर कमी झाला आहे, पण सणासुदीच्या काळात गर्दी वाढते, त्यामुळे या काळात कोरोना वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. राज्यात लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी चर्चा सुरू आहे, आदर पूनावाला पुण्यात परत आल्यानंतर यावर निर्णय होईल असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. 


शासनाच्या नियमावलीचं पालन केलं पाहिजे


जमावबंदी असताना गर्दी होत असेल तर गुन्हे दाखल केले जातात, शासनाच्या नियमावलीचं सर्वांनी पालन केलं पाहिजे. राजकारणी असो वा सामान्य नागरिक नियम सगळ्यांना सारखेच आहेत, तिसरी लाट येऊ नये याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.


एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये


अनियमित पगारामुळे धुळ्यात एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली, यावर बोलताना अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन केलं आहे. 3 दिवसांपूर्वी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत चर्चा झाली, एस टी ला 500 कोटी रुपये देण्याचा निर्णय झालेला आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.


अधिकार निवडणूक आयोगाला


महापालिका निवडणुकीत किती सदस्यांचा प्रभाग असावा याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. राज्य सरकारलाही तो अधिकार आहे. स्थानिक नेत्यांची काही वेगळी मतं आहेत. त्या सगळ्याचा विचार होऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.


सर्व पक्षांचं एकमत


जोपर्यंत ओबीसीवर झालेला अन्याय दूर होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत यावर सर्व पक्षांचं एकमत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकलाचे उल्लंघन न करता काय मार्ग काढता येईल यावर विचार सुरू आहे. पुढच्या आठवड्यात पुन्हा बैठक होईल. सगळ्या पक्षाचे गटनेते, वरिष्ठ नेते एकत्र बसून निर्णय होईल, असं अजित पवार यांनी सांगितलं.