योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : महागाई, गरीब परिस्थितीमुळे नाशिकमधल्या मुलींना शिक्षण घेत कठीण झालं आहे. पण सावित्रीच्या या लेकींच्या शिक्षणात बाधा येवू नये म्हणून वडनेर भैरव ग्रामपालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. नाशिक जिल्ह्यामधील वडनेर भैरव ग्रामपालिकेने गावातील शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या प्रवासाचा खर्च ग्रामपालिकेतून करण्याचे ठरवले आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निर्णयामुळे ग्रामीण भागात मुलींना शिक्षण देण्याचा आत्मविश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण होणार आहे. गावातल्या मुली शिरवाडे फाट्याजवळच्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या महाविद्यालयात शिक्षण घेतात. 


गेल्या काही वर्षांत महाविद्यालयातून ड्रॉपआऊट होणाऱ्या मुलींची संख्या वाढली. गावातून वडनेर फाट्यापर्यंतचा प्रवास परवडत नसल्यानं गावकऱ्यांनी मुलींचं शिक्षण बंद केलं. ही बाब प्राचार्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब वडनेर भैरवच्या सरपंचांच्या लक्षात आणून दिली. 


त्यानंतर तात्काळ त्यांनी या मुलींच्या प्रवासाचा खर्च ग्रामपालिकेच्या खात्यातून करण्याचा निर्णय घेतला. या योजनेचा फायदा गावातल्या २१० मुलींना होणार आहे. प्रवासापोटीचे ३ लाख १५ हजार रुपये ग्रामपालिकेनं महाविद्यालयाला दिले आहेत. 


'गाव करी ते राव काय करी..' अशी म्हण आहे. या गावानं सावित्रीच्या लेकींची शिक्षणाची वाट सुकर करुन ही म्हण खरी करुन दाखवली. ग्रामपंचायतीच्या या अनोख्या निर्णयामुळे विद्यार्थींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.