योगेश खरे / नाशिक : राज्यात ट्रेकिंगसाठी सर्वात कठीण समजला जाणारा नाशिकचा हरिहर गड, ट्रेकर्समध्ये विशेष प्रसिद्ध आहे. हाच गड सर करून दाखवलाय नाशिकमधल्या ६८ वर्षांच्या आजींनी. विशेष म्हणजे आजींसोबत, त्यांच्या नातवानेही हा अवघड गड सर केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्यटक आणि ट्रेकर्ससाठी आकर्षणाचं केंद्र असलेला हरिहर गड नाशिकमधल्या आशा अंबाडे या आजींनी सर केला आहे. समुद्रसपाटीपासून ३ हजार ६७६ फूट उंच असलेला हरिहर गड ८० अंशांच्या कोनात आहे. त्यामुळे हा त्रिकोणी गड सर करणं भल्याभल्यांना जमत नाही. 



मात्र नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात राहणाऱ्या अंबाडे कुटुंबातील सर्वांनाच ट्रेकिंगची आवड असल्यानं, घरातला प्रत्येक जण ट्रेकिंगला जातो. त्यातूनच यावेळी आशा अंबाडे आजींसोबत हरिहर गड सर करायचा निश्चय अंबाडे कुटुंबाने केला आणि तसे प्रयत्न सुरू झाले. 


आजींचा फिटनेस पाहता त्या हा गड निश्चित चढणार असा विश्वास अंबाडे कुटुंबातल्या प्रत्येकालाच होता. आणि ६८ वर्षांच्या आशा अंबाडे आजींनी आपला साडे पाच वर्षांचा नातू मृगांशसोबत हा किल्ला सहजपणे सर केला. आजींच्या या जिद्दीचं सर्वत्र कौतुक होत आहे. 


6\