मराठवाडा : आज १४ जानेवारी अर्थात मकरसंक्रांतीचा दिवस.पण आजचा दिवस मराठवाड्यासाठी फक्त मकरसंक्रांतीचा दिवस म्हणूनच नाही तर आणखी एका कारणासाठी महत्वाचा समजला जातो तो म्हणजे मराठवाडा विद्यापीठाचा 'नामविस्तार दिन' म्हणून.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज मराठवाडा विद्यापीठाचा  २४ वा नामविस्तार दिन म्हणून साजरा केला जातोय.


अभिवादनास गर्दी 


नामविस्तार दिनानिमित्त राज्यभरातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे लाखो अनुयायी औरंगाबादमध्ये दाखल होऊन मराठवाडा विद्यापीठाच्या गेटवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात. त्यामुळे आज सकाळपासूनच बाबासाहेबांच्या अनुयायांनी विद्यापीठाच्या गेटवर येऊन त्यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केलीये.


१९५३ मध्ये मराठवाड्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी औरंगाबादमध्ये मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आलं.या विद्यापीठाच्या स्थापनेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्वाची भूमिका घेतली. 


१४ जानेवारी नामविस्तार दिन 


१९५८ पासून या विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याची मागणी जोर धरू लागली. ही मागणी पूर्ण करत १४ जानेवारी १९९४ रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याची घोषणा केली.


तेव्हापासून १४ जानेवारी हा दिवस नामविस्तार दिन म्हणून साजरा केला जातो.


या नामविस्तार दिनानिमित्त आजच्या दिवशी बाबासाहेबांचे लाखो अनुयायी विद्यापीठाच्या गेटवर येऊन त्यांना अभिवादन करतात तर विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी जे शहिद झाले त्यांना अभिवादन केल्या जाऊन नामविस्तार दिन बाबासाहेबांच्या लाखो अनुयायांकडून उत्साहात साजरा केला जातोय.


नेत्यांची हजेरी 


विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे औरंगाबादमध्ये येऊन बाबासाहेबांना अभिवादन करणार आहे.