नवी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी एक अभिनव कल्पना राबविली होती. विद्यार्थी आणि मराठी वाचक यांच्यापर्यत मराठी लेखकांची दहा हजार पुस्तक घरोघरी नेण्याचा अभिनव उपक्रम काळे यांनी राबविला होता. त्यानंतर आता मराठी राजभाषा दिनानिमित्त गजानन काळे यांनी आणखी एक संकल्प केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा गौरव दिवस मोठया उत्साहात साजरा करण्याचे आदेश मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांना दिले आहेत. मराठी भाषा गौरव दिवस जितका भव्य करता येईल तितका तो करण्याचे व त्यात लोकांचा जास्तीत जास्त सहभाग असावा अशा सूचनादेखील राज ठाकरे यांनी दिल्या आहेत.


नवी मुंबई मनसेतर्फे "मराठी राजभाषा" दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईकरांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात येणार आहेत. नवी मुंबईकरांना समक्ष भेटून त्यांना पोस्ट कार्ड भेट देण्यात येणार आहे.


"मी कपाळी लाविता गंध मराठी भाषेचा, अभिमान माझ्या मातीचा आसमंत जाहला" अशा आशयाच्या शुभेच्छा या पोस्ट कार्डवर लिहिण्यात आल्या आहेत. जगविख्यात सुलेखनकार अच्युत पालव यांची कॅलिग्राफी आहे. तर, शुभेच्छा सुप्रसिद्ध लेखक राहुल सिद्धार्थ साळवे यांनी शब्दबध्द केल्या आहेत.


नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या संकल्पनेतून साकाराला आलेल्या या पोस्ट कार्डचे अनावरण मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते राजगड, दादर कार्यालय येथे करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाचे अमित ठाकरे यांनी कौतुक केले. यावेळी नवी मुंबई मनसेच्यावतीने पहिले शुभेच्छा पोस्टकार्ड मनसे नेते अमित ठाकरे यांना देण्यात आले.


या प्रसंगी नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, सचिन आचरे, सहसचिव अभिजित देसाई, अमोल इंगोले, नितीन लष्कर, शरद डिगे, विधी कक्षाचे निलेश बागडे, चित्रपट सेनेचे किरण सावंत आणि अनिकेत पाटिल उपस्थित होते.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मराठी भाषा गौरव दिवस नवी मुंबईत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी नवी मुंबईकरांना समक्ष भेटून त्यांना एक लाख पोस्ट कार्ड घरोघरी जाऊन देण्याचा संकल्प केल्फ्याची माहिती नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी दिली.