चंद्रपूरच्या ताडोबातील गाईड फाडफाड इंग्लिश बोलणार, पर्टकांशी वन टू वन साधणार
ताडोबा प्रशासनाने इथल्या गाईड्स साठी इंग्लिश स्पिकिंग चे विशेष क्लास सुरु केले आहेत.
आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूरच्या ताडोबातील गाईड फाडफाड इंग्लिश बोलताना दिसणार आहेत. हे गाईड इंग्रजी भाषेतून पर्टकांशी वन टू वन साधणार आहेत. यामुळे मराठी हिंदी भाषा येत नसलेल्या तसेच भारतीय तसेच परदेशी पर्यटकांना हे गाईड इंग्रजी भाषेतून ताडोबा सफरीत मार्गदर्शन करणार आहे. चंद्रपूरचा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (Tadobaandhari Tiger Reserve of Chandrapur) हे महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन स्थळ आहे.
गाईड्ससाठी इंग्लिश स्पिकिंग चे विशेष क्लास
दरवर्षी लाखो पर्यटक ताडोबाला भेट देतात. येथील गाईड्सना दक्षिण भारतातून आणि विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसोबत संवाद साधताना अनेक अडचणी येतात. यासाठी ताडोबा प्रशासनाने इथल्या गाईड्स साठी इंग्लिश स्पिकिंग चे विशेष क्लास सुरु केले आहेत.
ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा जगातील अतिशय लोकप्रिय असलेला व्याघ्र प्रकल्प आहे. यामुळेच ताडोबा ला देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. मात्र, दक्षिण भारतातून आणि विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना मराठी आणि हिंदी येत नसल्याने स्थानिक गाईड त्यांना ताडोबाची माहिती देऊ शकत नाही. हीच अडचण ओळखून पर्यटकांना टायगर सफारी घडविणाऱ्या गाईड्ससाठी आता ताडोबा प्रशासनाच्या वतीने इंग्लिश स्पिकिंगचे विशेष क्लास सुरु करण्यात आले आहेत.
इंग्रजीतून पर्यटकांशी संवाद साधणार
ताडोबातील गाईड हे स्थानिक आदिवासी असल्याने आणि अल्प शिक्षित असल्याने त्यांना इंग्लिश बोलता येत नाही. त्यामुळे जंगलाची आणि निसर्गाची इत्यंभूत माहिती असून देखील ताडोबातील गाईड्स पर्यटकांशी संवाद साधू शकत नाही. मात्र, या इंग्लिश स्पिकिंग च्या सरावामुळे आता त्यांची ही समस्या लवकरच दूर होणार आहे.