मुंबई / नागपूर : Holi celebration  : होळी आणि धुळवडीच्या दिवशी दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्यांची होळी थेट कोठडीत जाईल, असा इशारा नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. याशिवाय फुगे फेकून मारणाऱ्यांवरही पोलिसांचा वॉच राहणार आहे. तसेच सरकारकडून होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमीबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. (Guidelines for Holi, Dhulivandan and Rang Panchami released in Maharashtra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होळी, धुलिवंदन आणि शब-ए-बारात शांततेत पार पाडण्यासाठी नागपुरात 4 हजार पोलसांचा बंदोबस्त राहणार आहे. या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शांतता समितीची बैठक घेतली. (Holi festival)


होळीला धुडगूस घालणाऱ्या युवकांना, ट्रीपल सीट वेगाने वाहन चालविणारे आणि कर्ण र्कश्श हॉर्न वाजवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय होळी धुळवडीला गुन्हेगारीचा इतिहास पाहता शहरातील गुन्हेगारांची धर पकड करण्यात येत आहे.


होळी, धूलिवंदनबाबत मार्गदर्शक सूचना


होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमीबाबत गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी उत्सव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन अथवा गर्दी करुन साजरे न करता स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन साजरे करावे, असे गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.


होळी, शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी  17 मार्च, 2022 रोजी होळीचा सण आहे. कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतोवर गर्दी न करता कोविड अनुरुप वर्तणूक (Covid Appropriate Behaviour) नियमांचे पालन करुन साजरा करावा. तसेच 18 मार्च रोजी धूलिवंदन आणि 22 मार्च रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहेत. या सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करण्यात येत असते. परंतु कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत.


होळी, शिमगा सणानिमित्ताने (विशेष करून कोकणात) पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षीदेखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल याकरिता स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. तसेच त्याठिकाणी गर्दी होणार नाही व कोविड अनुरुप वर्तणूक  नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.