जळगावात वांग्याच्या भरीताचा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड
जळगावकर आपल्या सर्वांच्या आवडीचं वांग्याचं भरीत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार आहेत.
जळगाव : वांग्याचं भरीत असं नुसतं नाव जरी काढलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. गरमागरम भाकरी, वांग्याचं भरीत आणि चवीला कांदा अशी चव ज्यांनी चाखलेली असते ती त्यांच्या कायमची लक्षात राहण्यासाठीचं. महाराष्ट्रातील खवैयांना अभिमान वाटेल अशी गोष्ट जळगावकर करत आहेत. यामुळे जळगावकर आपल्या सर्वांच्या आवडीचं वांग्याचं भरीत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार आहेत.
भरीत जागतिक स्तरावर
जळगावच्या वांग्याच्या भरीताला जागतिक स्तरावर पोहचविण्यासाठी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आता लवकरच याची नोंद होणार आहे. मराठी प्रतिष्ठानच्या वतीने ३ हजार २०० क्विंटल वांग्याचे भरीत जळगावात तयार केले जाणार आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या उपस्थितीत हे रेकॉर्ड होणार आहे. त्यासाठी मराठी प्रतिष्ठान सज्ज झाले आहे.
महाकाय कढई तयार
आज प्रशासन तसच गिनीज बुक ऑफ रेकॉर्डच्या प्रतिनिधींसमोर भरितासाठी लागणारी कच्चे वांगी, मिरची, तेल, तसेच अन्य वस्तूंचे मोजमाप करण्यात आले. भरीत हे लेवा समाजाचे प्रमुख खाद्य समजले जाते. त्यामुळे लेवा समाजातील जेष्ठ व्यक्तीच्या देखरेखीखाली हे भरीत बनणार आहे.
त्यासाठी ५ हजार किलोग्रॅम क्षमतेची महाकाय कढई तयार करण्यात आलीय. उद्या सकाळी दहाला या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुकात होणार आहे.