गुलाब चक्रीवादळाचा फटका, राज्यात 7 ते 8 हजार कोटींचं नुकसान
नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करायचा की नाही याचा निर्णय घेणार
मुंबई : गुलाब चक्रीवादळामुळे गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस बरसतोय. या पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पीकं पाण्याखाली गेल्यानं हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतशिवाराचं मोठं नुकसान झालं आहे. बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन, तूर कपाशीचं मोठं नुकसान झालं आहे. याहीपेक्षा गंभीर म्हणजे शेत खरडून गेलंय त्यामुळे बळीराजच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला आहे.
राज्यात कोट्यवधींचं नुकसान
गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात 7 ते 8 हजार कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे. आतापर्यंत या पावसाळ्यात 436 लोकांना जीव गमवावा लागला आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यात 71 जणांचा पावसामुळे मृत्यू झाला आहे. तर 17 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. मृतांच्या वारसांना 4 लाखाची मदत केली जाणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.
अतिवृष्टीमुळे राज्यात प्रचंड नुकसान झालं आहे, यात कुणी राजकारण करू नये, केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र यात मदत केली पाहिजे असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. गेले दोन दिवस संततधार पावसाने अनेक भागातील नद्या ओसंडून वाहू लागल्या, धरणं ओसंडून वाहू लागली. त्यामुळे शेतीचं, मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे.
मराठवाड्यातील 10 पैकी 7 जिल्ह्यात 170 ते 180 मिमी पावसाची नोंद झाली आहे. उस्मानाबाद, लातूर औरंगाबाद एनडीआरएफच्या टीम पाठवल्या होत्या, जळगावला एसडीआरएफची टीम होती अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. 17 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे, 81 पंचनामे झाले आहेत, 19 टक्के बाकी आहेत, हे नुकसान गुलाब चक्रीवादळाच्या आधीचे आहेत, आताचे पंचनामे झाले तर हा आकडा वाढेल, साधारणपणे 22 लाख हेक्टरवर हा आकडा जाईल असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
एकट्या लातूरमध्ये 482 पैकी 381 महसूल नुकसान झालं आहे. काही ठिकाणी 4 वेळा तर काही ठिकाणी 8 वेळा अतिवृष्टी झाली आहे. रस्त्यांचं मोठं नुकसान झालंय, शेतीचे वीज पंप, अवजारे वाहून गेली आहेत. शेत जमीन खरडली गेलीय, काही ठिकाणी नदी नाल्यांनी प्रवाह बदलले आहेत, कोल्हापूर बंधारे वाहून गेले आहेत. राज्यातील किती जिल्हे प्रभावित झालेत त्याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे, सर्व माहिती घेतल्यानंतर पुढील मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करून ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत चर्चा होईल, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
नवनीत राणा यांचा इशारा
सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अन्यथा दिवाळीत मातोश्री बाहेर शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे. अतोनात नुकसान झालेलं असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र मराठवाडा, विदर्भ दौरा करीत नाही. सरकारमधले कृषिमंत्री दिसत नाहीत, अशी टीका त्यांनी केली आहे.