Maharashta Politics : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यावरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Kadse) व मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे पुन्हा आम्ही सामने आले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री अन्य कामांमध्ये व्यस्त असल्याने पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाहीये.शेतकरी हवालदिल झाला असताना पालकमंत्री मात्र दुर्लक्ष करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गुलाबराव पाटलांवर केली आहे. मात्र विरोध करणे हे खडसेंचे कामच आहे, त्यांनी तो कायम करायलाच पाहिजे व त्याशिवाय मजा येत नाही अशी प्रतिक्रिया देत मंत्री गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवरुन सरकारवर जोरदार टीका केली आहे. यासोबत जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे पण एकही मंत्री तिथे गेला नाही. मी गुवाहिटीला तपासले पण तिथेही दिसले नाहीत. सुरतला तपासल तिथे ही दिसले नाहीत, मग मंत्री आहेत कुठे? असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करण्याची मागणी एकनाथ खडसेंनी केली आहे.


पालकमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालण्याची गरज - एकनाथ खडसे


"या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांना वेळ नाही. ते अन्य कामांमध्ये व्यस्त आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यातील पालकमंत्री किंवा अन्य मंत्री ना कापसावर बोलत आहे ना केळीच्या पिकावर. यासंदर्भात कुठलीही मदत करत नाहीये. याठिकाणी दुर्लक्ष केले जात आहे. पालकमंत्र्यांनी यामध्ये तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे," असे एकनाथ खडसे म्हणाले होते.


खडसेंच्या विरोधाशिवाय मजा नाही - गुलाबराव पाटील


"बरेच लोक संपावर असल्याने थोड्या अडचणी येत आहेत. मध्ये शनिवार रविवारसुद्धा होता. पण आपण नियमीतपणे सर्वांना आदेश दिले असून सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होतील. एकही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही. एकनाथ खडसे यांचे कामच आहे विरोध करणे. त्यांनी तो करायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय मजा येत नाही," असे प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी दिले.