जळगाव : युतीच्या घोषणेनंतर शिवसेना नेत्यांनी लोकसभेच्या जागांवरील दावे सुरू केले आहेत. शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावची जागा शिवसेनेला सोडण्याची मागणी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जळगावात शिवसेनेचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे ११ तर शिवसेनेचे १२ जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्याचप्रमाणे या मतदारसंघातील नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक सभापती आहेत. मागच्या काळातील राजकीय आलेख पाहिला तर शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपला आघाडी मिळाली आहे. त्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला सोडावी अशी मागणी करण्याती आली आहे. भाजपचे ए. टी. पाटील हे जळगावचे विद्यमान खासदार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युतीची घोषणा करताना विधानसभेत समान जागा, समान पद आणि समान जबाबदाऱ्या या जागावाटपाच्या सूत्रामुळे अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शिवसेनेचा आग्रह मान्य झालाय की काय अशी चर्चा आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ अर्धा-अर्धा न करता शिवसेनेसाठी उपमुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं अशी माहिती सूत्रांकडून समजते आहे. शिवसेनेकडून गेल्या अनेक दिवसांपासून अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद असावं अशी मागणी केली जात होती. मात्र भाजप नेतृत्वानं ते वृत्त फेटाळलं. सूत्रांच्या माहितीनुसार युतीचं सरकार सत्तेवर आल्यास भाजपचाच मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. 


गेल्या साडेचार वर्षांपासून सत्तेत एकत्र असूनही विरोधकांप्रमाणे भांडणाऱ्या भाजप शिवसेनेनं अखेर सोमवारी आगामी निवडणुकीसाठी युतीची अधिकृत घोषणा केली. लोकसभेच्या २३ जागा शिवसेना लढवणार आहे तर भाजप २५ जागा लढवणार आहे. विधानसभेत मित्र पक्षांना जागा सोडल्यानंतर उरलेल्या जागा भाजप-शिवसेना समसमान लढवणार आहे. तसंच सत्ता आल्यानंतर समसमान मंत्रिपदाचं वाटप करण्यात येणार आहे. नाणार दुसरीकडे हलवण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. त्यामुळे या युतीच्या व्यवहारात शिवसेनेनं बरंच काही पदरात पाडून घेतल्याचं चित्र आहे.