गुणरत्न सदावर्ते सुनावणी : 250 एसटी डेपोतून 80 लाख गोळा, खंडणी की फी? न्यायालयात झाला हा युक्तीवाद !
Gunaratna Sadavarte hearing: एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये विलीन करण्यात यावे, यासाठी कर्मचारी संपावर गेले होते. त्यांची न्यायालयात बाजू वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मांडली. मात्र, आता त्यांच्यावर पैसे गोळा केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मुंबई : Gunaratna Sadavarte hearing: एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये विलीन करण्यात यावे, यासाठी कर्मचारी संपावर गेले होते. त्यांची न्यायालयात बाजू वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मांडली. मात्र, आता त्यांच्यावर पैसे गोळा केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यांनी एसटीच्या 250 डेपोमधून पैसे गोळा केले. त्यासाठी त्यांनी एक अर्ज तयार केला होता. त्यातून त्यांनी पैसे जमविले, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणीत अटक करण्यात आलेल्यांकडून करण्यात आला आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनीच कर्मचार्यांकडून पैसे जमा केले. त्यांनी एक फॉर्म तयार केला आणि 250 डेपोंमधून पैसे जमा केले, अशी धक्कादायक माहिती सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांनी शनिवारी न्यायालयात दिली. त्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणी वाढ झाली आहे. दरम्यान, या प्रकरणात गावदेवी पोलिसांनी अजित मगर नावाच्या आणखी एका आरोपीला अटक केली असून, अटक आरोपींची आकडा 117 झाली आहे. या सर्वांना न्यायालयाने 19 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
आपणास काय सांगायचे आहे काय, असे न्यायालयाने विचारताच आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सांगितले, कर्मचार्यांकडून मी पैसे घेतले नाही. मात्र सदावर्ते यांनी अर्ज तयार केले आणि पैसे गोळा करायला लावले. सदावर्ते आणि गोडबोले यात सहभागी आहेत. चंद्रकांत सूर्यवंशी यानेदेखील आम्ही काही केले नाही. सर्व काही सदावर्ते यांनी केले, असे न्यायालयाला सांगितले.
पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आधारे करण्यात आलेल्या दाव्यानुसार, अॅफिडेव्हिट फाईल करायचे असल्याचे सांगून 270 रुपये कर्मचार्यांकडून उकळण्यात आले. पैसा उकळण्यासाठी सदावर्ते यांच्याकडून एक फॉर्म तयार करण्यात आला होता. पुढे हा फॉर्म व्हॉट्सअॅपवर फिरवण्यात आला. त्यानंतर एकूण 250 डेपोतून पैसे गोळा करण्यात आले. मात्र कर्मचार्यांकडून गोळा करण्यात आलेल्या पैशांतून सदावर्ते यांनी काही मालमत्ता आणि कार खरेदी केल्याचा संशय आहे. हा तपास करण्यासाठी सदावर्ते यांचीदेखील कोठडी हवी, असे सरकारी वकिलांनी सांगितले.
सदावर्ते यांच्याकडून असा युक्तीवाद
पैसे गोळा केले म्हणजे खंडणी मागितलेली नाही. हा आरोप चुकीचा आहे. पैसे गोळा केले आणि ते खर्च केले किंवा नाही त्याचा अजूनही पत्ता नाही. सर्व जण तब्बल पाच महिने मैदानावर राहिले होते. पैशांसंदर्भात काही करार झाला नव्हता. समजा हा पैसा फीसाठी घेतला. तर फीबद्दल विचारण्यात आले नव्हते. त्यामुळे पैसा दाखवला नाही, असे म्हणणे चुकीचे आहे.
गुन्ह्यात दाखल करण्यात आलेली 403 आणि 406 कलमे यात लागूच होत नाही. कोणाचीही फसवणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणता पैसा, कुठे गेला, कसा गेला यासंबंधी चौकशी करायचा प्रश्न येत नाही. माझ्या अशिलाने मला पैसे दिले त्याची चौकशी करणे चुकीचे आहे. 80 लाख गोळा केले, असे म्हणत असतील ती माझी फी होती, असा दावा यावेळी सदावर्ते यांच्या बाजूने यावेळी करण्यात आला.