शिर्डी : गुरु पौर्णिमेसाठी साई भक्तांनी शिर्डीत गर्दी केलीय. पहाटे साडेचार वाजता काकड आरतीनं उत्सवाला सुरूवात झाली. शनिवारपासून द्वारकामाईत सुरु झालेल्या साई चरीत्राच्या अखंड पारायणाची सांगता करण्यात आली. त्यानंतर साईंची प्रतीमा, पोथी आणि सटका यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुपौर्णिमेच्या मुहुर्तावर साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी शिर्डीत अलोट गर्दी केलीय. साईच्या दर्शनासाठी पायी चालत येणा-या भक्तांचे जथ्थे शिर्डीत दाखल झालेत. साईंच्या मूर्तीला सुवर्णालंकारांनी सजवलंय. समाधी मंदिराच्या गर्भगृहाला आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आलीय. गुरुपौर्णिमेनिमित्त साई मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे. तर विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असणा-या श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावमध्येही भाविकांची गर्दी झाली आहे. 


सकाळच्या आरतीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. राज्यभरातून भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आले आहेत. अक्कलकोटमध्येही स्वामी समर्थांच्या मठात भाविकांनी मोठी गर्दी केली. सकाळपासूनच भाविक रांगेत उभे होते. स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्ट आणि अन्नछत्र मंडळाकडून गुरुपौर्णिमेनिमित्त गेल्या गेल्या दहा दिवसांपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. 


या कार्यक्रमात जेष्ठ गायक अजित कडकडे यांनी आपली सेवा दिली. दुसरीकडे मुंबईत दादरमधल्या एकशे दहा वर्षं जूना स्वामी समर्थ मठही भाविकांनी फुलून गेला. पहाटेपासून मठात वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं. हजारोंच्या संख्येने भाविक मठात स्वामींच्या दर्शनाला येतात. गुरूपौर्णिमेच्या निमित्तानं मठाला फुलांची आरास करण्यात आली.