मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतेक भागात १० ते १३ फेब्रुवारीदरम्यान गडगडाटासह वादळी वारे वाहून गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची कापणी करुन शेतकऱ्यांनी योग्य साठवणूक करावी. नागरिकांनी स्वत:च्या संरक्षणाची खबरदारी घ्यावी असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, नांदेड, लातूर जिल्ह्यांमध्ये तसेच अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील पूर्व भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.


पूर्व विदर्भामध्ये या दिवशी गारपीट होण्याची शक्यता अधिक आहे. ११ आणि १२ फेब्रुवारी रोजी या जिल्ह्यांमध्ये वादळवाऱ्याची आणि गारपीटीची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये या दोन्ही दिवशी अधूनमधून वादळी वारे वाहण्याची व ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. १३ फेब्रुवारी रोजी वादळवाऱ्याची तीव्रता कमी होईल तर १४ फेब्रुवारीपासून हवामान सर्वसाधारण होण्याची शक्यता आहे.