रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यातील कुडनूर या गावी मुलांच्या शाळेमध्ये हँड ग्रेनेड बॉम्ब (Hand Grenade) सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुलं खेळत असताना त्यांचा चेंडू खिडकीतून आत गेल्याने तो आणण्यासाठी शाळेच्या खोलीत गेले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांना तेथे बॉम्ब आढळून आला. त्यानंतर परिसरात घबराट पसरली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर मुलांना गावकऱ्यांना याबाबत माहिती दिली. गावचे उपसरपंच गुलाब पांढरे यांनी  पोलीस पाटील मंजुषा मनोहर कदम याबाब सांगितले. त्यानंतर पोलीस पाटलांनी जत पोलिसांना याबाबच माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी याची तात्काळ दखल घेतली. पोलीस पथक व सांगलीतील बॉम्ब पथक शाळेच्या ठिकाणी दाखल झाले. 


बॉम्बशोधक पथकाने शाळेसह आजूबाजूच्या परिसराची यावेळी तपासणी केली.  बॉम्ब ताब्यात घेऊन अधिक माहिती घेण्यासाठी बॉम्ब पथक सांगलीला रवाना झाले आहेत. त्यामुळे डफळापुर कुडनूर व जत तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


दरम्यान 2017 सालीही अशीच घटना समोर आली होती. कुडनूर या गावीच दोन बॉम्ब सापडले होते. त्यावेळीही सांगली बॉम्ब पथक याठिकाणी दाखल झाले होते. 


पुण्यातही शाळेच्या परिसरात बॉम्ब


मंगळवारी पुण्याच्या मांजरीतील अण्णासाहेब मगर विद्यालयाच्या परिसरात जुना बॉम्ब सापडला होता. यानंतर बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तातडीने बॉम्ब निकामी केला.