दोन्ही पायाने अपंगत्व तरीही दोन गावांचं सरपंचपद सांभाळणारी कविता
दोन्ही पायाने अपंगत्व, तरीही टेलरिंगचा व्यवसाय करत करत ती दोन गावांचा सरपंच पदाचा कारभार समर्थपणे चालवते.
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : दोन्ही पायाने अपंगत्व, तरीही टेलरिंगचा व्यवसाय करत करत ती दोन गावांचा सरपंच पदाचा कारभार समर्थपणे चालवते. विकासही करून दाखवते अन् पुन्हा बिनविरोध निवडून ही येतेय. एक महिला सरपंचाची प्रेरणादायक बातमी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातल्या दहेगावमधून...
सर्वानुमते सरपंचपदीही निवडली गेली
दिंडोरी तालुक्यातील दहेगाव आणि वागळूद या दोन्ही गावांची मिळून दहेगाव ग्रुप ग्रामपंचायत. दोन्ही पायाने अपंगत्व असताना कविता आज यशस्वी सरपंच आहे. २४-२५ वर्षांची असताना गावाने निवडणुकीत तिला निवडून दिल आणि सर्वानुमते सरपंचपदीही निवडली गेली. यात विशेष हे कि पोलिओमुळे अपंगत्व आलेली ३०-३२ वर्षांची हि तरुणी होती. सध्या ती दोन गावांचे सरपंचपद सांभाळते आहे. तिने ग्रामपंचायतींच्या कारभारात आमुलाग्र कायापालट घडवून आणळा आहे.
गावाचा कारभारच रुळावर आणला
दिंडोरी तालुक्यातील कविता भोंडवेने नुसता गावाचा कारभारच रुळावर आणला नाही, तर गावातील अवैध धंद्यांविरुद्धही ती उभी ठाकली गावातील दारू दुकाने, मटक्याच्या अड्ड्यांविरोधात एल्गार पुकारला. महिलाना संघटित करून पोलीस ठाण्यासमोर आंदोलन छेडले. कविताच्या या प्रयत्नांनंतर गावातील अवैध धंदे बंद झाले.
भ्रष्टाचार समूळ निपटून काढला
कविताने ग्रामपंचायतीचा कारभार समजावून घेतला. ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा नियमितपणे बोलावू लागली. भ्रष्टाचार समूळ निपटून काढला. दहेगाव आणि वागळूद या दोन्ही गावांतील महिलाचे बचतगट स्थापन केले. त्यांना पहिल्या वर्षी १५ हजार, दुसर्या वर्षी एक लाखाचे कर्ज मिळवून दिले.
कविताच्या या कष्टाला सलाम...
आता तिच्या ग्रामसभेला सर्व महिला उपस्थित असतात आणि तिला नेहमी साथ देतात सध्या कविताची सरपंचपदाची दुसरी टर्म आहे. दोन्ही गावांनी दुसर्यांदाही एकमताने तिलाच सरपंच केले आहे. सात वर्षांत तिने दोन्ही गावांचा गाडा रुळावर आणला आहे. मुलींमध्ये शिक्षणाची जागृती करणे, स्वच्छता मोहीम याबाबतही ती कार्य करते. त्यासाठी तिने विवाहही केला नाही हे विशेष. सध्या आपला टेलरिंगचा व्यवसाय सांभाळून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतेय व्यवसाय सांभाळत विकासाचा गाडा हाकणाऱ्या कविताच्या या कष्टाला सलाम...