अमरावती: सध्या अमरावती जिल्ह्यातल्या हरिसाल गावाची राजकीय पटलावर विशेष चर्चा आहे.  देशातील पहिले डिजिटल गाव म्हणून या गावाने लौकिक मिळवला होता. मात्र, लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे हरिसालच्या डिजिटिलीकरणाविषयी अनेक शंका उपस्थित झाल्या होत्या. अखेर गावचे उपसरपंच गणेश येवले यांनी पुढाकार घेत या वृत्ताचे खंडन केले आहे. त्यासाठी गणेश येवले यांनी थेट फेसबुक लाईव्ह करत सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले. याशिवाय, 'झी २४ तास'नेही  हरिसालच्या सरपंचांसह नागरिकांशी संवाद साधला. यावेळी अनेक  गावकऱ्यांनी डिजिटल सुविधांमुळे आपल्याला कसा फायदा झाला, हेदेखील सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या राजकीय सभांमध्ये हरिसाल गावाचा जो व्हीडिओ दाखवण्यात आला तो पूर्णपणे खोटा आहे. यामुळे देशभरात गावाची बदनामी झाली. गावात इंटरनेटच उपलब्ध नसेल तर आज मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधू शकलो नसतो, अशी भावना यावेळी गणेश येवले यांनी व्यक्त केली. 



या फेसबुक लाईव्हमध्ये गणेश येवले यांनी डिजिटल व्हिलेजच्या माध्यमातून गावात आलेल्या सुविधांचा पाढाही वाचला. २०१६ साली गाव डिजिटल झाल्यापासून आम्हाला अनेक डिजिटल सुविधा मिळाल्या आहेत. याठिकाणी एचपी, मायक्रोसॉफ्ट, जल्दीफाय अशा कंपन्यांच्या मदतीने तंत्रज्ञान पोहोचले आहे. गावातील इंटरनेट व्यवस्थित काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या सगळ्यामुळे गावातील पर्यटनही वाढल्याचा दावा येवले यांनी केला.