नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. भाजपने राष्ट्रवादीतून आलेल्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे चव्हाण बंडखोरी करण्याची शक्यता आहे. उद्या दुपारी सुरगाणामध्ये खासदार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एका मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत चव्हाण हे पुढील दिशा निश्चित करणार आहे. दरम्यान, त्याआधी भाजपकडून त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक नाराज पदाधिकाऱ्यांची मने वळवली आहेत. त्यामुळे चव्हाण यांचेही बंड क्षमेल, अशीही चर्चा सुरु आहे.


राष्ट्रवादीला डॉ. भारती पवार यांनी दे धक्का दिला आहे. घडाळ्याची साथ सोडत कमळ हातात घेतले. दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादीने धनराज महाले यांना उमेदवारी जाहीर केल्याने भारती पवार या नाराज झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. भारती पवार यांनी मागील लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिंडोरी मतदारसंघातून लढवली होती. पक्षाने भारती पवार यांना उमेदवारी दिल्याने विद्यामान खासदार चव्हाण प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांनी पुन्हा निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. मात्र, पक्षाने त्यांचे तिकीट कापले. त्यामुळे ते आता बंडखोरीच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.