हरियाणाच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकाराणावर मोठा परिणाम! महाविकास आघाडीत महाबिघाडी
काँग्रेसला स्वबळावर निवडणूक लढवायची असेल तर काँग्रेसनं भूमिका स्पष्ट करावी, असं मोठं विधान खासदार संजय राऊतांनी केलंय. हरियाणाच्या निकालानंतर शिवसेना उद्धव ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी ही भूमिका मांडलीय.
Mahavikas Aghadi : हरियाणाच्या निकालावरून मविआत घमासान सुरू झालंय.. कारण काँग्रेस स्वबळावर लढणार का हे त्यांनी जाहीर करावं असं थेट आव्हान संजय राऊतांनी दिलंय.. त्यावर काँग्रेसनंही रोखठोक भूमिका जाहीर केलीय.. त्यामुळे मविआत बिघाडी होणार का याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगतेय याचा वेध घेऊयात
हरियाणाच्या निकालामुळं राज्यातील महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झालीय. काँग्रेसनं मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलेलं असतानाच संजय राऊतांनी काँग्रेसला डिवचलंय. काँग्रेसनं हरियाणात लहान पक्षांना सोबत घेतलं नाही, त्यामुळं त्यांचा पराभव झाल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलाय.. महाराष्ट्रात काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार का याबाबत भूमिका स्पष्ट करावी असा थेट सवाल संजय राऊतांनी केलाय.
संजय राऊतांनी केलेली टीका काँग्रेसला चांगलीच झोंबलीये. काँग्रेसला स्वबळाबाबत विचारणाऱ्या संजय राऊतांना जाब विचारणार असल्याचं नाना पटोलेंनी सांगितलंय. मविआतील नेत्यांमध्ये जुंपली असतांना त्यात आता देवेंद्र फडणवीसांनी उडी घेतलीय.कालपर्यंत हम साथ साथ म्हणणारे आता हम आपके है कोन म्हणत असल्याचा टोला फडणवीसांनी लगावलाय..
राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या भूमिका घेत असलो तरी आतून आम्ही सर्व एक असल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय. 4 एकीकडे संजय राऊत आणि नाना पटोलेंनी आक्रमक भूमिका घेतली असताना तिकडे बाळासाहेब थोरातांनी मात्र सावध भूमिका घेत आम्ही एकत्रच लढणार असल्याचं स्पष्ट केलंय.काँग्रेसचा हरियाणात पराभव झाल्यानं ठाकरे गटानं काँग्रेससोबतचे जुने हिशोब चुकते करण्यास सुरुवात केलीय. आता स्वबळावरुन निर्माण झालेला मविआतील अंतर्गत वाद मिटणार की वाद आणखी विकोपाला जाणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल