COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : नाशिक शहराला अंमली पदार्थांचा विळखा पडल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या दोन महिन्यात १० जणांना अटक करण्यात आलीय. आतापर्यंत कोट्यवधी रूपयांचे अंमली पदार्थ नाशिक पोलिसांनी हस्तगत केलेत. नाशिकच्या तपोवन परिसरात ३४ लाखांचा ७०० किलो गांजा जप्त करण्यात आलाय. धक्कादायक म्हणजे भाजीपाल्याच्या क्रेटमध्ये दडवून या गांजाची वाहतूक सुरू होती. यातीश शिंदे आणि सुनील शिंदे यांना अटक करण्यात आलीय. ओडिशातून आयशर गाडीतून १२०० किलो गांजा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत हा गांजा पकडण्यात आला. पकडलेला गांजा आणि मिळालेली माहिती यात ५०० किलोंची तफावत आहे.


नाशिकमध्ये वारंवार अशा घटना घडायला लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शहरात एमडी ड्रग सापडलं होतं. नाशिक पोलिसांनी बोईसरमध्ये कारवाई करत एमडी ड्रगचा कारखानाही उध्वस्त केला होता. सात जणांना अटकही झाली होती. मात्र अशा घटना परत परत घडत असल्याने पोलिसांसमोर आव्हान उभं राहीलंय. 


शहरातली गुन्हेगारी हा आधीपासूनच पोलिसांच्या चिंतेचा विषय राहीला आहे. त्यातच नाशिकमध्ये सातत्याने गावठी कट्टेही सापडत होते. आता त्यात अंमली पदार्थांची भर पडत असल्याने नाशिक ही अंमली पदार्थांची राजधानी होते की काय अशी शंका यायला लागली आहे.