मुंबई: त्र्याहत्तरावी घटनादुरूस्ती, उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय, निवडणुका घेता येत नाहीत अशी कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती या सर्व बाबींचा विचार करूनच कोरोना महामारीच्या काळात गावगाडा सुरळीत चालावा यासाठी गावातील योग्य व्यक्तीची प्रशासकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाला करावा लागला आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय हेतू नसून लोकशाही मार्गाने पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी योग्य कार्यक्षम व्यक्तीची नियुक्ती करावी हीच अपेक्षा आहे, असे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पत्र पाठवले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील गावे समृध्द करण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. याविषयी लवकरच आपणाशी चर्चा करणार आहे. तसेच, प्रशासकाच्या निर्णयाबाबतही भेटीच्या वेळी सविस्तर माहिती देईन, असेही मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रात म्हटले आहे.


ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनी राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर केल्या जाणाऱ्या प्रशासकाच्या नियुक्तीबाबत ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांना पत्र लिहीले होते.


ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमताना पालकमंत्र्यांचा सल्ला घ्यावा, असे परिपत्रक काढून ग्रामविकास विभागाने घटनेची व कायद्याची पायमल्ली केल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला होता. प्रशासक नियुक्तीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा उपोषण करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला होता.